
कोरोना हा अदृश्य शत्रू आहे. तो कोणत्याही रूपाने मानवी शरीरात प्रवेश करतो. दुसऱया लाटेनंतर लॉकडाऊन निर्बंध शिथिल झाले असले तरी कोणीही निष्काळजीपणा करू नका, कोरोना नियमांचे पालन करा, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
अमृतवाहिनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे तालुका व शहरातील कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, सभापती सुनंदा जोर्वेकर, जि. प. सभापती मीरा शेटे, नवनाथ आरगडे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर आदी उपस्थित होते.
महसूलमंत्री थोरात म्हणाले, संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून, कोरोनाची रुग्णवाढ कमी आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर होणारी गर्दी चिंताजनक आहे. कोरोना अद्याप संपलेला नाही म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. काही तज्ञांच्या मते तिसरी लाट येऊ शकते म्हणून प्रत्येकाने शासकीय नियमांचे पालन केले पाहिजे. लक्षणे असणाऱयांचे विलगीकरण करा. ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट या त्रिसूत्रीचा वापर करून जास्तीत जास्त गावे कोरोनामुक्त करण्यासाठी सहभाग घेतला पाहिजे. संगमनेर तालुक्यात सध्या 81 गावे कोरोनामुक्त झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

























































