बुधवारपर्यंत गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता; सोमवारी रेड अलर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झाल्यामुळे येत्या बुधवारपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बुधवारपर्यंत गोव्यासह संपूर्ण कोकणात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या सोमवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मान्सून दाखल झाल्यानंतर 7 ते 9 जून या कालावधीत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा शुक्रवारपासून अधिक तीव्र झाला आहे. त्यामुळे तेथून गोवा, कोकणच्या दिशेने बाष्पयुक्त वारे वेगाने वाहत आहेत. रविवार आणि सोमवारी या वाऱ्याचा वेग ताशी 40 किमीपेक्षा अधिक राहील. त्यामुळे राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

बुधवारपर्यंतच्या चार दिवसांत मुसळधार कायम राहील. काही भागात 24 तासात साडेचार ते पाच इंच पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे पूरसदृश्य परिस्थिती, झाडे कोसळून पडझड, वाहतुकीत अडथळे, पाणी, वीज पुरवठ्यात खंड, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, समुद्राला उधाण आदींसारख्या घटना घडू शकतात. याशिवाय महामार्गांकडेच्या दरडीही कोसळू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी, अशा सूचना विभागाने केल्या आहेत.

बुधवारपर्यंत अरबी समुद्रात ताशी सुमारे 60 किमी वेगाने वारे वाहू शकतात. समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होऊन समुद्राला उधाण येऊ शकते. त्यामुळे मच्छिमारांनी बुधवारपर्यंत मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.