स्वर्गीय दत्ताजी साळवी फाऊंडेशनचे आज ऑनलाइन उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ कामगार नेते, भारतीय कामगार सेनेचे संस्थापक-अध्यक्ष, शिवसेना नेते स्वर्गीय दत्ताजी साळवी यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त मंगळवार, 15 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत स्वर्गीय दत्ताजी साळवी फाऊंडेशनचे ऑनलाइन उद्घाटन केले जाणार आहे. दत्ताजी साळवी यांना अभिप्रेत असलेले विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवण्यासाठी साळवी यांच्या कुटुंबीयांनी या फाऊंडेशनची स्थापना केली आहे.

ज्येष्ठ कामगार नेते, भारतीय कामगार सेनेचे संस्थापक-अध्यक्ष, शिवसेना नेते स्वर्गीय दत्ताजी साळवी यांच्या कार्याच्या आठवणी शिवसैनिक आणि कामगारांच्या मनात आजही कायम आहेत. शिवसेना आणि भारतीय कामगार सेना म्हणजे दत्ताजी साळवी यांचा जीव की प्राण होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा दत्ताजी साळवी यांचा प्राण होता. शिवसेना हेच आयुष्य आहे असे मानून जगणारे दत्ताजी साळवी शिवसैनिकांच्या मनात कायम घर करून आहेत. त्यांच्या आठवणींचे जतन व्हावे आणि त्यांना अभिप्रेत असलेले कार्य पुढे सुरू राहावे, यासाठी 15 जून या त्यांच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय दत्ताजी साळवी फाऊंडेशनच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. कार्यक्रमाला शिवसेना नेते मनोहर जोशी, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, उपनेते खासदार अरविंद सावंत, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार राहुल शेवाळे, पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत, पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, आमदार सदा सरवणकर, यामिनी जाधव, नगरसेविका प्रीती पाटणकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती फाऊंडेशनचे सल्लागार अशोक नलावडे यांनी दिली.