
कर्नाळा बँकेच्या 529 कोटींच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेले शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना आज ईडीने अटक केली. त्यांच्या निवासस्थानी जाऊन ईडीच्या झोन-2 चे सहायक संचालक सुनील कुमार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या 529 कोटींचा घोटाळा काही वर्षांपूर्वीच उघड झाला होता. याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यासह संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास ईडी करत आहे. रिझर्व्ह बँकेला कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या व्यवहारात अनियमितपणा निदर्शनास आल्याने त्यांनी सहकार आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी तातडीने रायगड जिल्हा विशेष लेखापरीक्षक यू. जी. तुपे यांची नियुक्ती करून पुनर्तपासणी केल्यानंतर 63 कर्ज खात्याद्वारे 512 कोटींचा घोटाळा उघड झाला. त्यानंतर चौकशीत तो आकडा तब्बल 529 कोटींवर गेला आहे, परंतु कारवाई करताना चालढकल होत असल्याचा आरोप करत पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. यासाठी यांनी सहकार खाते, गृहखात्याच्या गुप्तवार्ता विशेष गुन्हे शाखा (सीआयडी) आणि ईडीच्या प्रमुखांना भेटून चर्चा केली होती.
स्वतंत्र तपास करणार
कर्नाळा बँकेचा ईडी स्वतंत्ररित्या तपास करणार आहे. त्यामुळे विवेक पाटील यांच्यानंतर घोटाळ्यातील अन्य कुणाकुणावर अटकेची कारवाई होते, याकडे ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.




























































