
दादोजी कोंडदेव पुरस्कारप्राप्त, डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लब या महिला संघाचे संस्थापक बापू खरमाळे यांचे 14 जून रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी ते 69 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. दहा दिवसांपूर्वी त्यांना जुन्नर-पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. पण सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बापू खरमाळे यांच्या निधनानंतर कबड्डी क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात आली. बापू खरमाळे हे क्रीडा शिक्षक म्हणून डॉ. शिरोडकर हायस्कूल येथे नोकरीवर रुजू झाले. त्या ठिकाणी त्यांनी कबड्डी, खो-खो व लंगडी या खेळावर लक्ष केंद्रित केले.
पण परळ या भागात कबड्डीचा जोर जास्त असल्याने कबड्डीकडे त्यांचा अधिक ओढा होता. खेळाडूंच्या खेळाची व मानसिकतेची जाण असलेला तज्ञ प्रशिक्षक महाराष्ट्राने गमावला. त्यांची उणीव महाराष्ट्राला नेहमीच जाणवत राहील, अशा शब्दांत महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह आस्वाद पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संघटनेचे अध्यक्ष अजित पवार व कार्याध्यक्ष गजानन कीर्तिकर यांनीदेखील हळहळ व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली दिली.
































































