पश्चिम बंगाल भाजपा फुटीच्या उंबरठय़ावर; राज्यपालांच्या भेटीवेळी भाजपाचे 74 पैकी 24 आमदार गैरहजर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगाल भाजपा फुटीच्या उंबरठय़ावर आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेस सोडून अनेक नेते, पदाधिकारी भाजपात दाखल झाले होते. भाजपाच्या पराभवानंतर त्यांची आता घरवापसी सुरू झाली आहे. त्यांना रोखण्याचे भाजपाचे प्रयत्न अपयशी ठरू लागले आहेत. राज्यपालांच्या भेटीवेळी भाजपाचे 74 पैकी 24 आमदार गैरहजर होते. ते तृणमूलमध्ये परतण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जाते.

विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी सोमवारी भाजपा आमदारांच्या शिष्टमंडळाला घेऊन राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली होती. त्यावेळी 24 आमदार शुभेंदू यांच्याबरोबर नव्हते. सर्वच भाजपा आमदार शुभेंदू यांना आपला नेता स्वीकारण्यास तयार नाहीत, अशी चर्चा त्यानंतर सुरू झाली आहे. भाजपाचे अनेक आमदार तृणमूल काँग्रेसच्या संपका&त असल्याचेही बोलले जात आहे.

30पेक्षा जास्त आमदार ममतादीदींच्या संपर्कात

30पेक्षा जास्त भाजपा आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा तृणमूल काँग्रेसने केला आहे. मुकुल रॉय यांच्यासह तृणमूल सोडलेल्या नेत्यांना परत यायचे असेल तर त्यांचा नक्कीच विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते. सोनाली गुहा आणि दीपेंदू बिस्वास या नेत्यांनी तर आपल्याला पुन्हा स्वगृही परतायचे असल्याचे जाहीररीत्या म्हटले होते.

भाजपाध्यक्षांच्या बैठकीकडेही आमदारांची पाठ

विरोधी पक्षनेतेच नव्हे, तर बंगाल भाजपा अध्यक्ष दिलीप घोष यांच्या बैठकीकडेही अनेक आमदारांनी पाठ फिरवली. या बैठकीला भाजपा खासदार शांतनू ठाकूर आणि तीन इतर आमदार बिस्वजीत दास, अशोक कीर्तनिया आणि सुब्रत ठाकूर हे अनुपस्थित होते. शांतनू ठाकूर यांचा भाजपाच्या सीएए कायद्याला सुरुवातीपासूनच विरोध आहे.

अनेक भाजपा आमदार तृणमूलच्या वाटेवर

गेल्याच आठवडय़ात मुकुल रॉय हे तृणमूलमध्ये परतल्याने भाजपाला झटका बसला होता. रॉय यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवून कृष्णानगर उत्तर मतदारसंघातून विजय मिळवला होता. रॉय यांच्यानंतर राजीव बॅनर्जी, दीपेंदू बिश्वास आणि सुभ्रांशू रॉय यांच्यासह इतर नेतेही तृणमूलमध्ये घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जाते.