आंबोली दरीत उडी मारून विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न, स्थानिक बचाव पथकाच्या धाडसाने वाचले प्राण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथील घाटाच्या दरीमध्ये नगरच्या एका विवाहितेने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. आंबोलीच्या प्रसिद्ध मुख्य धबधब्यापासून काही अंतरावर ही घटना आज घडली. मात्र, खोल दरीत पडण्याऐवजी दरीतील एका कठड्याला ती अडकली. या घटनेबाबत स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर आंबोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. स्थानिक बचाव पथकाच्या माध्यमातून संबंधित महिलेला वाचविण्यात यश आले आहे.

कमल रामनाथ इंदे (वय 25, सध्या रा. शिरोडा, मूळ रा. नगर) असे या महिलेचे नाव आहे. कमल इंदे यांचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले आहे. पती रामनाथ इंदे येथील शिरोडा प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. त्यामुळे दोघेही शिरोडा येथे भाडोत्री घरात राहतात. कमल इंदे या आज एकट्याच आंबोली बस स्थानकात आल्या होत्या. तेथून सायंकाळी परत घरी जाण्यासाठी बस नसल्याने रिक्षातून परत जाताना अचानक तिने रिक्षा थांबवून घाटदरीत उडी मारली. स्थानिक रिक्षाचालक भाऊ पाटील यांनी तत्परता दाखवीत पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून स्थानिक बचाव पथकास पाचारण करीत दरीतून संबंधित महिलेस बाहेर काढले.