
चोरांच्या भीतीपोटी फळबागांमध्ये लाठ्या-काठ्यांसह आंब्यांचे रक्षण करणे सामान्य आहे. मात्र मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये दोन आंब्याच्या झाडाचे रक्षण करण्यासाठी चार रक्षक आणि 6 कुत्र्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या फळबागातून कोणीही आंबा चोरू नये म्हणून त्या झाडाच्या मालकाने ही खास व्यवस्था केली आहे. दोन आमच्या झाडासाठी इतका कडेकोट पहारा का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. त्यामागे विशेष कारण आहे. ही झाडे हिंदुस्थानातील दुर्मिळ आणि जगात सर्वात महाग असलेल्या आंब्याची झाडे आहेत.
हा आंबा जपानमधील खास लाल रंगाचा मियाझाकी आंबा आहे. सूर्याचे अंडे या नावानेही या आंब्याला ओळखले जाते. याला जगातील सर्वात महागड्या आंब्याचा दर्जा मिळाला आहे. या आंब्याबाबत शेतकरी जोडप्याने असा दावा केला आहे की, मागील वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांनी प्रति किलो 2.70 लाख रुपये दराने हा आंबा विकला आहे. शेतकरी संकल्प आणि राणी परिहार यांनी तीन वर्षांपूर्वी जबलपूर येथील बागेत या आंब्याची दोन रोपे लावली होती. जी चेन्नईच्या एका व्यक्तीने त्यांना दिली होती.
या खास आंब्याच्या जाती आणि किंमतीबद्दल संकल्प आणि राणी यांना आधी काहीच माहिती नव्हती. या आंब्याचे रोपटे लावल्यानंतर काही वर्षांनी त्यांना या झाडाला लाल रंगाचे दोन आंबे लागल्याचे दिसले. लाल रंगाचे आंबे झाडाला पाहिल्यानंतर त्यांनी या आंब्याच्या जातीबद्दल जाणून घेण्याच्या प्रयत्न केला असताना हा आंबा मियाझाकी जातीचा असल्याचं त्यांना समजलं. हा आंबा आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति किलो 2.70 लाख रुपये दराने विकला गेला होता. ही बाब बाजारात पसरली तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या बागेत हल्ला केला. त्यांनी झाडाची दोन फळे व फांद्या चोरुन नेल्या. यानंतर झाडाच्या मालकांनी झाडाच्या रक्षणासाठी चार रक्षक आणि 6 कुत्र्यांची व्यवस्था केली.


























































