
वाईहून पाचगणीला जाणारी मोटार पसरणी घाटात सोळा नंबर स्टॉपजवळ रस्त्याच्या संरक्षक कठडय़ावर चढून दरीत गेली. काही फूट अंतरावर झाडाला अडकली; अन्यथा चारशे फूट दरीत कोसळली असती. नशीब बलवत्तर म्हणून मोटारीसह पुण्यातील कुटुंब बचावले.
पुण्याहून पाचगणीला राहण्यासाठी स्थानिक कुलीन ठक्कर व त्यांचे कुटुंबीय आले होते. कामानिमित्त ते आज वाईला आले होते. वाईतील काम संपवून पसरणी घाटातून पाचगणीला जात असताना सोळा नंबर स्टॉपजवळ त्यांची मोटार संरक्षक कठडय़ावर चढून दरीच्या बाजूला घुसली. काही फूट अंतरावर असणाऱया झाडात अडकल्यामुळे एक पुरुष व दोन महिलांचे प्राण वाचले.
पसरणी घाटातून पाचगणीकडे जात असताना मुसळधार पाऊस आणि घाटातील धुक्यामुळे चालकाला रस्त्यावरील वळण लक्षात न आल्याने मोटार रस्त्यावरील संरक्षक कडय़ावर चढून दरीत घुसली. या अपघातात मोटारीचे किरकोळ नुकसान झाले असून, कोणीही जखमी झाले नाही. नशीब बलवत्तर म्हणून गाडीतील सर्वांचेच प्राण वाचले. घटनेनंतर वाई पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने मोटार बाहेर काढली.

























































