
कोरोना काळातही स्वित्झर्लंडच्या बँकांमध्ये हिंदुस्थानींची संपत्ती वाढतीच राहिली आहे. 2020 मध्ये हा आकडा 20,700 कोटी रुपयांपर्यंत पोहचला असून ही मागील 13 वर्षांतील सर्वाधिक वाढ आहे, तर 2019 च्या तुलनेत ही 212 टक्के वाढ म्हणजेच 3.12 पट जास्त आहे. ही माहिती स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेने गुरुवारी जारी केलेल्या वार्षिक अहवालात दिली आहे. म्हणजेच कोरोना महामारीचा स्विस बँकांतील हिंदुस्थानींच्या वाढत्या धनसाठय़ावर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही हे आता स्पष्ट झाले आहे.
स्विस बँकेच्या या आकडेवारीत हिंदुस्थानातील बँका आणि इतर आर्थिक संस्थांच्या पैशांचाही समावेश आहे. स्विस बँकांमधील रक्कम वाढल्यामुळे सिक्युरिटीज आणि इतर गोष्टींमधून होल्डिंग्स मोठय़ा प्रमाणात वाढल्या, परंतु कस्टमर डिपॉझिटमध्ये मात्र सलग दुसऱया वर्षी घट झाली आहे.
रोख ठेवींत ब्रिटन टॉपवर
2020 च्या अखेरपर्यंत स्विस बँकेत 161.78 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. यात इतर देशांतील 48.53 लाख कोटी रुपये आहेत. रोख ठेवींत ब्रिटन 30.49 लाख कोटी रुपयांसह टॉपवर आहे. दुसऱया नंबरवर 12.29 लाख कोटींसह अमेरिका आहे. याशिवाय अन्य टॉप 10 ठेवीदार देशांमध्ये वेस्ट इंडीज, फ्रान्स, हाँगकाँग, जर्मनी, सिंगापूर , लक्सेमबर्ग, केमेन आयलंड आणि बहामास या देशांचा समावेश आहे.
डिपॉझिटमध्ये 6 टक्के घट
रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार यापूर्वी दोन वर्षे स्विस बँकांमधील हिंदुस्थानींच्या पैशात घट पाहायला मिळाली होती. 2019 च्या अखेरीस स्विस बँकांमध्ये हिंदुस्थानी नागरिक आणि हिंदुस्थानी कंपन्यांचे 6,625 कोटी रुपये होते. हा आकडा 2018 पेक्षा 6 टक्क्यांनी कमी होता. स्विस बँकांमध्ये हिंदुस्थानी नागरिक आणि हिंदुस्थानी कंपन्यांचे 2020 च्या अखेरपर्यंत जमा असलेल्या 20,706 कोटींच्या रकमेपैकी 4,000 कोटी कस्टमर डिपॉझिट, 3100 कोटी इतर बँकांतून आलेले, 16.5 कोटी ट्रस्टद्वारे आलेले आणि 13,500 कोटी रुपये बॉण्ड, सिक्युरिटीज आणि इतर आर्थिक पर्यायांमधून आलेले आहेत.
बँक म्हणते याला ‘काळे धन’ म्हणणार नाही!
स्विस बँक म्हणते, स्वित्झर्लंडमधील बँकांत जमा झालेल्या या पैशांना ‘काळे धन’ म्हणू शकत नाही. कारण या आकडय़ांमध्ये हिंदुस्थानी नागरिक, एनआरआय किंवा इतर लोकांचे पैसे त्रयस्थांमार्फत (थर्ड कंट्री एंटिटीजद्वारे) जमा झालेले नाहीत. त्यामुळे त्याला ‘काळे धन’ म्हणणे योग्य ठरणार नाही असे बँकेचे म्हणणे आहे.




























































