वरळी पोलीस वसाहतीतील जुन्या 51 इमारतींच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा, 92 कोटी 80 लाखांच्या निधीची तरतूद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वरळीच्या पोलीस वसाहतींतील 51 इमारतींच्या दुरुस्ती प्रश्नाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची तत्काळ दखल घेतली असून या इमारतींच्या नूतनीकरणासाठी 92 कोटी 80 लाखांचा निधी तत्काळ मंजूर करण्यात आला आहे. या नूतनीकरणाचा शुभारंभ आज शिवसेना नेते, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पोलीस बांधवांच्या पत्नींच्या हस्ते आज पार पडला.

वरळी पोलीस वसाहतीत 63 जुन्या इमारती असून यापैकी 12 इमारतींची संरचनात्मक कामे यापूर्वीच पूर्ण करण्यात आली आहेत. या इमारती समुद्रालगत उंच टेकडीवर असल्याने या इमारतींच्या कॉलम, बीम्स, स्लॅब व प्लास्टरला मोठय़ा प्रमाणावर तडे जाऊन या इमारती कमकुवत झाल्या आहेत. या इमारतींची दुरुस्ती व्हावी यासाठी शिवसेनेने वारंवार पाठपुरावा केला. आदित्य ठाकरे यांनी स्थानिक आमदार म्हणून हा प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न केला. इमारतींच्या बाह्य भागाचे संरचनात्मक मजबुतीकरण तसेच बाह्य अंतर्गत गिलावा, गच्चीवर गळती प्रतिबंधक उपाययोजना, सदनिकांमधील फरशी, किचन ओटे, प्रसाधनगृहे यांची दुरुस्ती, दरवाजे, खिडक्यांची दुरुस्ती, अंतर्गत व बाह्य रंगकाम करण्यात येणार आहे.

यावेळी शिवसेना उपनेते सचिन अहिर, माजी आमदार सुनील शिंदे, विभागप्रमुख बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर, नगरसेवक अरविंद भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पाटील, कार्यकारी अभियंता इंदूरकर, उपविभाग संघटक जोती दळवी, शाखाप्रमुख जीवबा केसरकर, संगीता जगताप आदी उपस्थित होते.