कार्ड क्लोनिंग करून करत होते फसवणूक, फसवणुकीच्या रकमेत मिळायचे 20 टक्के कमिशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेट्रोल पंपावर, दुकानात येणाऱया ग्राहकाच्या कार्डचा डेटा स्किमरच्या माध्यमातून चोरून बँक खात्यावर डल्ला मारणाऱया तीन ठगांना दहिसर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. राघवेंद्र शेट्टी, अखिल शेख आणि दीपक कारंडे अशी त्या तिघांची नावे आहेत. त्या तिघांनी गेल्या तीन महिन्यांत 6 लाख 51 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात एका फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

शहरात गेल्या काही दिवसांपासून स्किमरच्या माध्यमातून ग्राहकाचा डेटा चोरून बँक खात्यावर डल्ला मारल्याचे प्रकार घडत आहेत. दहिसर येथेदेखील अशाच प्रकारे काही जण फसवणूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळून परिमंडळ 12 चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड यांच्या पथकातील सहायक निरीक्षक ओम तोटावार, पांगे, पोळ, केळजी, सांबरेकर, लहांगे, सय्यद यांनी तपास सुरू केला.

तोटावार यांचे पथक दहिसर पूर्वच्या युनायटेड मोबाईल शॉपमध्ये गेले तेव्हा बनावट एटीएम कार्डचा वापर करून मोबाईल खरेदी करणाऱया राघवेंद्र, अखिल आणि दीपकला पोलिसांनी ताब्यात घेतले. एकेकाळी हॉटेलचा मॅनेजर असलेला राघवेंद्र आणि मेपॅनिकल इंजिनीअर असलेला अखिल हे दोघे डेटा चोरून तो दीपकला देत असायचे. त्यानंतर दीपक हा कार्डच्या माध्यमातून पैसे एका खात्यातून दुसऱया खात्यात ट्रान्सफर करायचा. फसवणूकप्रकरणी त्या तिघांना दहिसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी क्लोन केलेले 40 कार्ड, 250 रिकामी कार्ड, एक स्वॅप मशीन, तीन मोबाईल, लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली.

कोलकात्यात बनावट कंपनी आणि नाशिकमध्ये बँक खाते

दीपकने कोलकाता येथे ‘द स्टार’ नावाची बनावट कंपनी सुरू केली. त्या कंपनीच्या नावाखाली नाशिक येथे एका खासगी बँकेत खाते उघडले. त्या बँकेच्या खात्यावर फसवणुकीचे पैसे जमा केले जायचे. या टोळीने एका खासगी बँकेची पैसे स्वॅप करण्याची मशीनदेखील मिळवली होती. गेल्या तीन महिन्यांत आतापर्यंत या टोळीने 6 लाख 51 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या टोळीने मुंबई, ठाण्यात कुठे स्किमर लावले आहेत त्याचा तपास दहिसर पोलीस करत आहेत.