परळीत महिलांचा रूद्रावतार; कंटेनरने राखेची वाहतूक करणाऱ्यांना शिकवला धडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उघड्या कंटेनरमधून होणारी राखेची वाहतूक सामान्य नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राखेची वाहतूक करणाऱ्यांना कोणाचाही धाक नसून त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे शुक्रवारी महिलांनीच रूद्रावतार दाखवला. त्यांनी राखेची वाहतूक करणारे कंटेनर रोखले. कंटेनर चालकांना खाली ओढत जाब विचारला आणि रस्त्यावर पडलेली राख साफ करायला लावली.

परळीजवळील गोपीनाथगड येथील रहिवाशी महिलांनी रोखेची वाहतूक करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला. परळी येथील विद्युत औष्णिक केंद्रातून जमा झालेली राख वीट भट्टीसाठी वापरली जाते. या राखेची कंटेनरद्वारे वाहतूक केली जाते. राखेची वाहतूक करताना कंटेनरमध्ये राख झाकणे आवश्यक असते. मात्र अनेकदा या विरोधात आवाज उठवूनही याची दखल घेतली गेली नाही. उघड्या कंटेनरमधून राख वाहतूक करताना हवेमुळे ती राख उडते. त्याचे दुष्परिणाम या भागातील नागरिकांना सहन करावे लागत आहेत. राखेमुळे आरोग्य तर धोक्यात आलेच आहे. तसेच शेतीचेही नुकसान होत आहे. शुक्रवारी सकाळी परळीजवळील गोपीनाथगड येथील स्थानिक महिलांनी रूद्रावतार दाखवला. राख वाहतूक करणारे कंटेनर त्यांनी रोखले. कंटेनर चालकांना गाडीतून खाली खेचून जाब विचारला आणि त्यांना खाली पडलेली राख साफ करायला लावली.