मुंबईकर पृथ्वी शॉवर होतोय अन्याय; सुमार कामगिरीनंतरही शुभमन गील हिंदुस्थानच्या मुख्य संघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्थानिक क्रिकेट स्पर्धा तसेच आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडल्यानंतरही मुंबईकर युवा फलंदाज पृथ्वी शॉ याला हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या मुख्य संघात स्थान दिले जात नाही. मात्र त्याच्याऐवजी टीम इंडियाच्या संघात प्रवेश देण्यात आलेल्या शुभमन गीलला सुमार कामगिरी केल्यानंतरही हिंदुस्थानी संघात कायम ठेवण्यात येत आहे. हिंदुस्थानातील तमाम क्रिकेटप्रेमींमधून याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. बीसीसीआय तसेच राष्ट्रीय निवड समितीने याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. याप्रसंगी दैनिक ‘सामना’ने यावर टाकलेला हा प्रकाशझोत…

आयपीएलमध्ये पृथ्वीचीच बाजी

आयपीएलचा अर्धा मोसम या वर्षी हिंदुस्थानात पार पडला. उर्वरीत मोसम यूएईमध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात खेळवण्यात येणार आहे. हिंदुस्थानात पार पडलेल्या लढतींमधील कामगिरीवर नजर टाकल्यास पृथ्वी शॉ याने शुभमन गीलपेक्षा सरस कामगिरी केलीय हे प्रकर्षाने दिसून येईल. पृथ्वी शॉने दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करताना आठ सामन्यांमध्ये तीन अर्धशतकांसह 308 धावांचा पाऊस पाडलाय. या वेळी त्याने 166.48 स्ट्राईक रेटच्या सरासरीने फलंदाजी केलीय. यात 12 खणखणीत षटकार व 37 दमदार चौकारांचा समावेश आहे. शुभमन गीलला मात्र कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळताना आपला ठसा उमटवता आलेला नाही. शुभमन गीलला सात सामन्यांमधून फक्त 132 धावाच करता आल्या आहेत. या कालावधीत त्याला 117.85 इतक्याच स्ट्राईक रेटने फलंदाजी करता आलीय. त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली ती 43 धावा.

नऊ डावांत फक्त एक अर्धशतक

शुभमन गील याने मागील काही महिन्यांत पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही निराशाजनक कामगिरी केलीय. इंग्लंडविरुद्धचे चार कसोटी सामने आणि न्यूझीलंडविरुद्धचा एक कसोटी सामना यांच्यामधील कामगिरीवर दृष्टिक्षेप टाकल्यास शुभमन गील अपयशी ठरलाय हे पटकन कळून येईल. मागील नऊ डावांतील त्याची धावसंख्या 29, 50, 0, 14, 11, 15 नाबाद, 0, 28, 6 अशी आहे. याचाच अर्थ मागील नऊ डावांत त्याला फक्त एकच अर्धशतक झळकावता आले आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये हिंदुस्थानला न्यूझीलंडकडून हार सहन करावी लागली. या पराभवामध्येही फलंदाजांचे अपयश कारणीभूत आहे.

मुख्य संघात स्थान मिळायला हवे

हिंदुस्थानचे दोन संघ आगामी काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वात प्रमुख खेळाडूंचा हिंदुस्थानी संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. तसेच शिखर धवनच्या नेतृत्वात बेंचवरील खेळाडूंचा संघ श्रीलंकेशी झटपट मालिकेत (वन डे व टी-20) दोन हात करील. या संघात पृथ्वी शॉची निवड करण्यात आली आहे. पण पृथ्वी शॉला टीम इंडियाच्या मुख्य संघात स्थान द्यायला हवे, असा सूर क्रिकेटप्रेमींमधून उमटू लागला आहे.

विजय हजारे ट्रॉफीत धावांचा रतीब

हिंदुस्थानला 19 वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱया पृथ्वी शॉ याने या वर्षी पार पडलेल्या विजय हजारे या मानाच्या क्रिकेट स्पर्धेत धावांचा रतीब घातला. त्याने या स्पर्धेतील आठ सामन्यांमध्ये 165.40च्या सरासरीने व 138.29च्या स्ट्राईक रेटने 827 धावांची बरसात केलीय. पृथ्वी शॉने या स्पर्धेत चार संस्मरणीय शतके व एक अर्धशतक झळकावले आहे. तसेच या दरम्यान त्याने 25 शानदार षटकार व 105 नेत्रदीपक चौकारही चोपून काढलेत.

 गुलाबी चेंडूसह खेळलेल्या कसोटीत सर्वच अपयशी

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यात गेल्या वर्षी अॅडलेड येथे गुलाबी चेंडूसह डे-नाईट कसोटी खेळवण्यात आली. या कसोटीत हिंदुस्थानचा दुसरा डाव 36 धावांमध्ये कोलमडला. या डावात हिंदुस्थानचे सर्व फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते. पण फक्त पृथ्वी शॉलाच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. इतर फलंदाजांना मात्र टीम इंडियात कायम ठेवण्यात आले. अॅडलेड येथे डे-नाईट कसोटी खेळण्याची हिंदुस्थानची ही पहिलीच खेप होती. त्यामुळे पृथ्वी शॉला एका लढतीतील कामगिरीच्या आधारावर बाहेर बसवणे योग्य ठरले नाही.