>> विवेक दिगंबर वैद्य
श्रीस्वामीसमर्थांच्या आशीर्वादाने आप्पासाहेब माने यांची कन्या जमनाबाई पुढे बडोदा संस्थानची राणी, श्रीमंत खंडेराव गायकवाड यांची पत्नी व श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराज यांची मातोश्री म्हणून प्रसिद्ध झाली. त्यांची पहिली कन्या तारकादेवी अर्थात ताराबाबा अल्पायुषी ठरली. विवाहोपरांत काही दिवसांतच तिची जीवनज्योत मालवली तेव्हा श्रीमंत जमनाबाईंनी या कन्येच्या स्मरणार्थ सूरसागर तलावानजीक श्रीतारकेश्वराचे देवालय उभारले, सोबत श्रीविठ्ठल मंदिराची निर्मिती केली.
प्रकृतीच्या नित्य कुरबुरीला कंटाळून आत्महत्या करण्यासाठी ब्रह्मनिष्ठ वामनबुवा सुरसागराच्या काठावर आले. मात्र त्यांना अविचारापासून परावृत्त करण्यासाठी तिथे अक्कलकोटचे श्रीस्वामीसमर्थ साक्षात अवतरले. श्रीस्वामींनी वामनबुवांना बोध केला आणि आत्महत्या करण्यापासून रोखले. यानिमित्ताने ब्रह्मांडनायकाचा चरणस्पर्श सुरसागर तलावाकाठी ज्या परिसराला लाभला तिथे श्रीस्वामीसमर्थ मंदिराच्या स्थापनेद्वारे ही अलौकिक घटना कायमस्वरूपी स्मृतीबद्ध करण्यात आली. सुरसागर तलावाचे ‘स्थानमाहात्म्य’ अधोरेखित करणारी ही घटना होती.
बडोद्यातील मांडवी गेट, गेंडीगेट परिसराचे ‘स्थानमाहात्म्य’ वाढण्याकरिता त्याकाळी असे अनेक प्रसंग घडले आणि कित्येक वास्तू उपयोगात आल्या. स्वामी विवेकानंद यांच्या नावाने सर्वत्र परिचित असलेल्या आणि गेंडीगेटपर्यंत विस्तार पावलेल्या एका मार्गावरदेखील अशीच एक वास्तू आपले ‘स्थानमाहात्म्य’ वागवीत दिमाखाने उभी आहे. कै. शंकरराव पट्टणकर यांच्या राहत्या घरी पहिल्या मजल्यावर असलेले श्रीदत्ताचे मंदिर बडोद्यातील काही महत्त्वाच्या वास्तूंपैकी एक आहे. या वास्तूचा संबंधदेखील ब्रह्मनिष्ठ वामनबुवांशी निगडित आहे.
बडोद्यात आपल्या आयुष्याचा उर्वरित काळ व्यतीत करणाऱया वामन रावजी वैद्य वांबोरीकर अर्थात ब्रह्मनिष्ठ वामनबुवा यांच्या हातून एक महत्त्वाचे अलौकिक कार्य घडले ते म्हणजे ‘श्रीगुरुलीलामृत’ या ग्रंथाचे लेखन. श्रीस्वामीसमर्थ संप्रदायाचा ‘सांप्रदायिक ग्रंथ’ म्हणून ज्या ग्रंथाचा उल्लेख करण्यात येतो त्या ‘श्रीगुरुलीलामृत’ ग्रंथ-लेखनाद्वारे ब्रह्मनिष्ठ वामनबुवांनी श्रीस्वामीसमर्थांचे ओवीबद्ध चरित्र लिहिले. वामनबुवा वांबोरीकर यांनी 55 अध्याय आणि 9757 ओव्यांमधून साकारलेल्या ‘श्रीगुरुलीलामृत’ या श्रीस्वामीचरित्राचे हस्तलिखित कै. शंकरराव पट्टणकर यांच्या वंशजांनी आपल्या घरी अर्थात श्रीदत्तमंदिराच्या पवित्र वास्तूमध्ये आजही निगुतीने जतन केले आहे.
श्रीगुरुलीलामृत ग्रंथाच्या मूळ हस्तलिखितासह श्रीस्वामीसमर्थांनी वामनबुवांना दिलेल्या प्रासादिक पादुका व त्यांच्या नित्य वापरातील वस्त्र, वामनबुवांच्या पुजेतील श्रीदत्ताची तसबीर या व अशा अनेक अमूल्य वस्तू त्यासोबतच ज्या जागी बसून वामनबुवांनी ‘श्रीगुरुलीलामृत’ या ग्रंथाचे लेखन केले ते सर्वकाही पट्टणकर कुटुंबियांनी आस्थापूर्वक जतन केले आहे. कै. शंकरराव पट्टणकर हे ब्रह्मनिष्ठ वामनबुवा यांचे निकटचे सहकारी व समविचारी स्नेही होते. त्यांनी वामनबुवांचा केवळ सांभाळच केला नाही तर त्यांच्या हातून साकारलेल्या ‘श्रीगुरुलीलामृत’ या अद्वितीय ग्रंथाच्या प्रकाशनाची जबाबदारीदेखील घेतली. ग्रंथलेखनाच्या अखेरच्या टप्प्यात वामनबुवांनी अकल्पितपणे संन्यास घेतला आणि अवघ्या आठवडाभरात 25 मार्च 1901 रोजी ‘अद्वैतानंद’ हे नाव धारण केलेला हा निस्सीम स्वामीभक्त ‘समाधिस्थ’ही झाला.
अवचित ओढवलेल्या या प्रसंगामुळे डगमगून न जाता कै. शंकरराव पट्टणकर यांनी अन्य सहकाऱयांच्या साथीने वामनबुवांचे अखेरचे कार्य पार पाडले. श्रीनरहरेश्वर महादेव मंदिराच्या नजीक वामनबुवांची संगमरवरी चिरेबंदी समाधी बांधण्यात आली. आजही या समाधीस्थळाची व्यवस्था पट्टणकर कुटुंबियांकडून सांभाळली जाते. कै. शंकरराव पट्टणकर यांनी ब्रह्मनिष्ठ वामनबुवांच्या समाधीग्रहणानंतर त्यांच्या हातून साकारलेल्या ‘श्रीगुरुलीलामृत’ या ओवीबद्ध ग्रंथाचे हस्तलिखित छापील स्वरुपात प्रसिद्ध करण्याचे ठरविले. विनायक सदाशिव लिमगांवकर यांनी मुद्रणप्रत तयार केली आणि नारायण आबाजी पुरंदरे व बापुराव बबेराव बडवे यांनी ग्रंथ प्रकाशित केला. सन 1904मध्ये प्रसिद्ध झालेली ‘श्रीगुरुलीलामृत’ ग्रंथाची पहिली आवृत्ती मुद्रक कृष्णराव मराठे यांनी बडोदा वत्सल छापखान्यात छापली. या समग्र घडामोडींपाठी कै. शंकरराव पट्टणकर मुख्य प्रेरक व सूत्रधार होते. पट्टणकर यांची राहती वास्तू ‘श्रीगुरुलीलामृत’ आणि ब्रह्मनिष्ठ वामनबुवा यांच्या निमित्ताने एक अलौकिक व प्रासादिक ‘स्थानमाहात्म्य’ आजदेखील अभिमानाने आणि कृतार्थपणे जागवीत आहे. असो.
श्रीस्वामीसमर्थ संप्रदायाचा विस्तार समस्त विश्वभरात झालेला आहे. या संप्रदायाचे कर्तेधर्ते श्रीस्वामीसमर्थ महाराज यांच्या अवतारकार्याचे माहात्म्य दशदिशांना पसरलेले आहे. श्रीस्वामी अक्कलकोटी असताना त्यांच्या दर्शनार्थ लांबलांबहून अनेक मंडळी येत. सातारा जिह्याच्या रहिमतपूर येथील आप्पासाहेब माने यांची कन्या जमनाबाई लग्नास उपवर झाली. आपल्या योग्यतेनुसार आणि मुलीसाठी साजेसा वर कधी मिळणार या निरंतर काळजीने आप्पासाहेबांचे चित्त व्यापलेले होते. एके दिवशी श्रीस्वामीसमर्थांकडे जाऊन, त्यांच्या चरणी मस्तक ठेवून आप्पासाहेबांनी विनंती केली की, ‘‘मुलीस योग्य स्थळ मिळत नाही, तेव्हा महाराजांनी कृपा करावी.’’ त्यावर श्रीस्वामीसमर्थांनी जबाब दिला की, ‘‘काळजी का करितोस आम्ही तिला खंडय़ा नेमला आहे.’’ श्रीस्वामीसमर्थांच्या या वचनाचा अर्थ आप्पासाहेबांना उमगला नाही. मात्र त्या वचनावर विश्वास ठेवून ते स्वस्थ राहिले. काही दिवस गेल्यावर असा योगायोग घडला की, बडोदा संस्थानचे श्रीमंत खंडेराव महाराज गायकवाड यांच्याशी जमनाबाईंचा विवाहयोग जुळून आला. तेव्हा श्रीस्वामीमहाराज यांच्या ‘खंडय़ा नेमला आहे’ या वचनाचा अर्थ सर्वांना कळून आला. आप्पासाहेब राजघराण्याचे मानकरी होते. आपल्या कन्येचे लग्न राजेसाहेबांसोबत झाले, याचा त्यांना अतिशय आनंद झाला.
श्रीस्वामीसमर्थांच्या आशीर्वादाने आप्पासाहेब माने यांची कन्या जमनाबाई पुढे बडोदा संस्थानची राणी, श्रीमंत खंडेराव गायकवाड यांची पत्नी व श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराज यांची मातोश्री म्हणून प्रसिद्ध झाली. त्यांची पहिली कन्या तारकादेवी अर्थात ताराबाबा अल्पायुषी ठरली. विवाहोपरांत काही दिवसांतच तिची जीवनज्योत मालवली तेव्हा श्रीमंत जमनाबाईंनी या कन्येच्या स्मरणार्थ सूरसागर तलावानजीक श्रीतारकेश्वराचे देवालय उभारले, सोबत श्रीविठ्ठल मंदिराची निर्मिती केली. जमनाबाईंना श्रीस्वामीसमर्थांविषयी अपार भक्ती होती. या मंदिराच्या परिसरात श्रीमंत जमनाबाईंनी खास चितारून घेतलेले श्रीस्वामीसमर्थ महाराजांचे अप्रतिम चित्र पाहावयास मिळते.































































