मुंबई-पुणे डेक्कनचा ‘विस्टाडोम’ पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विस्टाडोम कोचच्या संगे पहिल्यांदाच मुंबई ते पुणे मार्गावर धावणाऱया डेक्कन एक्प्रेसला शनिवारी हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या दुसऱया लाटेनंतर या ट्रेनचा प्रवास एलएचबी डब्यांसह पुन्हा सुरू करताना प्रथमच या मार्गावर चालवलेल्या पारदर्शक विस्टाडोम कोचची सर्व 44 आसने बुक झाल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

एलएचबी रेक व विस्टाडोम कोचसह मुंबई-पुणे डेक्कन एक्प्रेस विशेष ट्रेनची पहिली फेरी शनिवार, 26 जूनपासून सुरू झाली आणि या मार्गावर प्रथमच पारदर्शक छताचा ‘विस्टाडोम’ कोच जोडल्याने प्रवाशांच्या तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. कोरोना काळातही विस्टाडोमच्या सर्वच्या सर्व सीट्स भरल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

जागतिक दर्जाच्या सेवा देणार…

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ‘ट्विटर’वर ‘मुंबई-पुणे मार्गावर विस्टाडोम कोचने प्रवासाचा आनंद वाढत आहे. यामध्ये प्रवास करणारे प्रवासी आपले सुखद अनुभव सांगत आहेत. प्रवाशांना जागतिक दर्जाचा अनुभव मिळण्यासाठी रेल्वे सतत प्रयत्नशील आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रवाशांनी मोबाईलवर सेल्फी घेतल्या…

पावसाळी वातावरणात लोणावळा आणि खंडाळा घाटातील निसर्गरम्य सौंदर्याचा मनमुरादपणे आनंद लुटता आला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्मवर कोचजवळ खास लावलेल्या सेल्फी पॉइंटवर प्रवाशांनी सेल्फीदेखील घेतली. याप्रसंगी प्रवाशांनी कोचसदृश चित्र असलेला केकही कापला. ‘आपल्या पत्नी व मुलासमवेत प्रवास करणारे एक प्रवासी उमेश मिश्रा यांनी केवळ परदेशात उपलब्ध असलेला विस्टाडोम कोच येथे सुरू केल्याबद्दल रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले. मुंबई आणि पुणेदरम्यानचा नियमित प्रवासी असून विस्टाडोम कोच जोडल्याने बोरघाटातील प्रवास अधिक आनंददायक झाल्याचे अन्य एका प्रवाशाने सांगितले. पावसाळ्यातील हिरवळीमुळे मोठय़ा खिडकीमधून या दृश्यांचा आनंद द्विगुणीत झाला असल्याचे सायली हिने म्हटले आहे.