भाजपच्या उपाध्यक्षाने पोलिसांना फेकून मारल्या देशी दारूच्या बाटल्या, बेकायदा धंद्याची पोलखोल झाल्याने तिळपापड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेकायदा धंद्याची पोलखोल करण्याकरिता गेलेल्या पोलीस तसेच पंचांवर भाजपच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षाने चक्क देशी दारूच्या बाटल्या फेकून मारल्याचा धक्कादायक प्रकार पालीत उघडकीस आला आहे. या हल्ल्यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या स्वागत राजेश मापारा बीयर बारचा मालक राजेश मापारा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात लवकरच अटक होण्याची शक्यता असल्याने भाजप पदाधिकारी मापाराची धुंदी उतरणार आहे.

सुधागड तालुक्यातील झाप येथे भाजपचा जिल्हा उपाध्यक्ष राजेश मापारा याचा स्वागत नावाचा बीयर शॉप तसेच परमीट बीयर बार’ आहे. याठिकाणी येथे अवैध दारू विक्री सुरू असल्याची तक्रार एका अर्जाद्वारे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे करण्यात आली होती. याचीच शहानिशा करण्याकरिता गुन्हा अन्वेषण शाखा व पाली पोलीस यांनी संयुक्तपणे या बारवर छापा टाकला. यावेळी दंडेली दाखवत मापारा याने शासकीय कामात हस्तक्षेप केले. मात्र यावरच न थांबता शिवीगाळ करत अधिकाऱ्यांच्या अंगावर धाव घेतली. तसेच देशी दारूच्या बाटल्या पोलीस व पंचांच्या दिशेने भिरकावल्या. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही.

जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवणार

संयुक्त कारवाईत देशी दारू सापडल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांकडून तयार केलेला अहवाल लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाईल. त्यानंतर पुढील कारवाईसंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.

नेमके काय झाले?

पोलीस पथक, पंचांसह शासकीय काम करीत असताना बारमालक राजेश मापारा पोलिसांच्या अंगावर धावन गेला. तसेच दुय्यम निरीक्षक रमेश मारुतीराव चाटे, जवान गणेश घुगे हे कारवाई करीत असतान त्यांच्या अंगावर देशी दारूच्या बाटल्या फेकण्यात आल्या. प्रसंगावधान असलेले सर्व अधिकारी व कर्मचारी वेळीच बाजूला झाल्याने कोणीही जखमी झाले नाही. पुढील तपास पाली पोलीस निरीक्षक विजय तायडे करत आहेत.