मानखुर्दच्या उड्डाणपुलाला छत्रपती शिवरायांचेच नाव देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मानखुर्द येथे बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव देण्यात येणार असल्याची ठाम भूमिका शिवसेनेने मांडली आहे. सध्या या पुलाचे बांधकाम सुरू असून काम पूर्ण झाल्यानंतर छत्रपती शिवरायांचेच नाव देण्यात येणार असल्याचे स्थापत्य समितीचे (उपनगर) अध्यक्ष स्वप्नील टेंबवलकर यांनी सांगितले. भाजपकडून शिवसेनेला बदनाम करण्यासाठी नाहक आरोप करून राजकारण केले जात असल्याचेही ते म्हणाले.

पालिकेच्या एम पूर्व विभागातील वीर जिजामाता भोसले मार्गावर हा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. या पुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नाव द्यावे अशा प्रस्तावावर स्थापत्य समितीच्या (उपनगरे) बैठकीत आयुक्तांचा अभिप्राय मांडण्यात आला. या उड्डाणपुलाला शिवरायांचे नाव देण्याचा प्रस्ताव सर्वात आधी शिवसेनेने मांडला आहे. असे असताना भाजपनेही आता या पुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे नाव देण्याची मागणी केली आहे. मात्र संबंधित पुलाचे बांधकाम अजूनही अपूर्ण असल्यामुळे सद्यस्थितीत पुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नाव देणे तांत्रिकदृष्टय़ा शक्य होत नसल्याचे आयुक्तांनी आपल्या अभिप्रायात स्पष्ट केले. त्यामुळे हा प्रस्ताव राखून ठेवत असल्याचे अध्यक्ष टेंबवलकर यांनी जाहीर केले. मात्र भाजपने शिवसेनेचा शिवरायांच्या नावाला विरोध असल्याचे सांगत सभात्याग केला. प्रस्तावावर आयुक्तांचा नकारात्मक अभिप्राय असताना भाजप उपसूचनाच कशी मांडते? असा सवालही टेंबवलकर यांनी केला. तांत्रिक अडचण असल्यामुळेच प्रस्ताव राखून ठेवला असताना भाजपने शिवसेनेला बदनाम करण्यासाठीच जाणीवपूर्वक राजकारण केल्याचेही टेंबवलकर म्हणाले.