
एका महिलेला फ्लॅट भाड्याने देणं चांगलच महागात पडलं आहे. सायबर चोरट्याने सैन्यदलात नोकरीला असून, तुमचा फ्लॅट आवडल्याचे सांगितले. त्यानंतर पैसे पाठविण्याच्या बहाण्याने संबंधिताने महिलेकडून बँकडिटेल्स घेत 50 हजारांची ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी सुबोध लोणकर (वय 24, रा. धानोरी ) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली.
सुबोध यांच्या वडिलांनी एका वेबसाईटवर त्यांच्या रिकाम्या फ्लॅटची जाहिरात दिली होती. संबंधित जाहिरात पाहून एकाने सुबोध यांच्या आईला मोबाईलवर मेसेज पाठविला. मी सैन्यदलात असून मला तुमचा फ्लॅट आवडला आहे. पैसे ट्रान्सफर करतो, असे सांगून सायबर चोरट्याने महिलेकडून सर्व माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या बँकखात्यातून 50 हजार रूपये ऑनलाईनरित्या काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे तपास करीत आहेत.
























































