
>> दुर्गेश आखाडे
मुंबईसह मराठवाडा, विदर्भात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असताना दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतरही कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मात्र रुग्णसंख्या वाढत आहे. नियमांचे उल्लंघन, विनामास्क फिरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, जिल्ह्याबाहेरून येणारी मंडळी, कोरोनाची लागण झाल्यानंतर फॅमिली डॉक्टरकडे जाणे, कोरोना चाचणी न करणे या कारणांमुळे कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मुंबईत फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. राज्यात लॉकडाऊन जाहीर होताच चाकरमानी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात आले. कोरोना तपासणी न करता आल्यामुळे पहिल्या लाटेपेक्षा दुसऱया लाटेत दोन्ही जिह्यांतील गावे मोठय़ा प्रमाणात कोरोनाबाधित झाली. ग्रामीण भागात एकत्र कुटुंब पद्धतीमुळे लॉकडाऊन असूनही गावात कोरोना पसरला. दरम्यान, कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतरही दुर्लक्ष केल्यामुळे आणि उशिरा उपचारांमुळे कोरोनाचा प्रसार वाढला आहे.
नियमांचे उल्लंघन, विनामास्क फिरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, बाजारपेठेत गर्दी यामुळे कोरोनाचा प्रसार होत आहे. मात्र आतापर्यंत साडेतीन लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
n डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी
लक्षणे नसलेला रुग्ण अनेकांना कोरोनाचा संसर्ग देऊन जातो. त्याचबरोबर रुग्णांनी वेळेत उपचार घेतले तर मृत्यूचे प्रमाणही कमी होऊ शकते आणि कोरोनाचा संसर्गही रोखता येऊ शकतो. सिंधुदुर्गात दररोज 7 हजार टेस्टिंग सुरू आहेत.
n डॉ. श्याम पाटील, कोविड विभागप्रमुख, सिंधुदुर्ग
आम्ही जयगडसारख्या ग्रामीण भागात काम करत आहोत. कोविडचा प्रसार रोखायचा असेल तर लोकांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. लोकांनी जागरुक राहिले पाहिजे.
n डॉ. श्रुती कदम, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटद
ताप आल्यानंतर तो कोरोना असेल की नसेल याचा विचार करण्यातच लोक वेळ घालवतात. अशा वृत्तीमुळे कोरोनाची तपासणी वेळेत होत नाही आणि त्याअनुषंगाने उपचारही मिळत नाहीत आणि शेवटच्या क्षणी परिस्थिती हाताबाहेर जाते.
n डॉ. मतीन परकार, परकार रुग्णालय, रत्नागिरी


























































