
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून हार सहन करावी लागल्यामुळे उपविजेते पदावर समाधान मानावे लागलेल्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाला आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी धक्का बसला आहे. युवा सलामीवीर शुभमन गील याच्या पायाला दुखापत झाली असून यामधून पूर्णपणे बरा होण्यासाठी त्याला किमान दोन महिन्यांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला मुकणार हे जवळपास निश्चित झाले आहे. लोकेश राहुल, मयांक अग्रवाल या दोन खेळाडूंपैकी एकाला सलामीला फलंदाजीला पाठवण्याचा पर्याय आता संघ व्यवस्थापनाकडे असणार आहे. याप्रसंगी दैनिक ‘सामना’ने विविध पर्यायांवर टाकलेला दृष्टिक्षेप.
पर्याय एक
शुभमन गीलच्या अनुपस्थितीत मयांक अग्रवाल याला रोहीत शर्मासोबत सलामीला पाठवता येईल. तो बराच काळ टीम इंडियासोबत आहे. पण मागील 11 कसोटी डावांमध्ये त्याला एकच अर्धशतक झळकावता आलेले आहे. त्यामुळे इंग्लंडमधील वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱया खेळपट्टय़ांवर टीम इंडियाचे व्यवस्थापन त्याला संधी देते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दुसरा पर्याय
लोकेश राहुल याचीही इंग्लंड दौऱयासाठी टीम इंडियात निवड करण्यात आली आहे. अर्थात फिटनेस पाहून त्याला अंतिम अकरामध्ये संधी देण्यात येईल. येथे प्रश्न उभा राहतो तो म्हणजे लोकेश राहुलला कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला खेळवायचा? सफेद चेंडूने खेळल्या जाणाऱया क्रिकेटमध्ये त्याला मधल्या फळीत फलंदाजीला पाठवण्यात येत आहे. तसेच गेल्या काही काळात त्याच्याकडून सलामीला धावाही झालेल्या नाहीत. त्यामुळे लोकेश राहुलकडे सलामीवीर तसेच मधल्या फळीतील फलंदाज म्हणून बघितले जाऊ शकते.
तिसरा पर्याय
हिंदुस्थानकडे आणखी एक पर्याय उपलब्ध आहे. हनुमा विहारी कसोटी क्रिकेटमध्ये सध्या मधल्या फळीत फलंदाजी करतोय. तो या क्रमांकावर संयमी फलंदाजी करू शकतो हे त्याने ऑस्ट्रेलियातही दाखवून दिले आहे. त्यामुळे त्याला सलामीला पाठवून लोकेश राहुलला मधल्या फळीत फलंदाजीला पाठवण्याचा पर्याय टीम इंडियाकडे असणार आहे. याप्रसंगी जेम्स अॅण्डरसन व स्टुअर्ट ब्रॉडसारख्या अनुभवी वेगवान गोलंदाजांचे आव्हान समर्थपणे थोपवून लावण्याचे काम हनुमा विहारीला करावे लागेल.




























































