पार्क केलेल्या गाडय़ा शिताफीने चोरायच्या. मग त्या गाडय़ांची नंबरप्लेट व चेसिस नंबर बदलून त्या कोणालाही विकणाऱ्या एका सराईत चोराला गुन्हे शाखा युनिट-4 च्या पथकाने पकडले आहे. चोरीची गाडी विकण्यासाठी आला असता पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून दोन चोरीच्या इको कार हस्तगत करण्यात आल्या आहेत.
चोरीची इको कार विकण्यासाठी एक सराईत चोर चेंबूर, छेडानगर येथे येणार असल्याची खबर युनिट-4 ला मिळाली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक इंद्रजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय बिराजदार, गव्हाणे, पाटील तसेच नार्वेकर, सावंत, मिंडे, बल्लाळ, जगताप व पथकाने छेडानगर परिसरात सापळा रचला. गोवंडी येथे राहणारा विनोद कुमार रामप्रसाद गुप्ता (32) हा सराईत चोरटा तेथे चोरीची इको कार विकण्यासाठी येताच पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. त्या कारसह त्याने विकलेली आणखी एक इको कार पोलिसांनी हस्तगत केली आहे. तसेच त्याच्या जवळ चोरलेल्या गाडय़ांचे कापलेले चेसिस, नंबरप्लेट मिळून आल्या. विनोद कुमार याच्या विरोधात कुर्ला, देवनार, खालापूर, टोकावडे, डायघर आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.



























































