
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने सोशल मीडियाचे मैदानदेखील गाजवले आहे. बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा हिला मागे टाकत विराट हा इन्स्टाग्रामवरील टॉप हिंदुस्थानी सेलिब्रेटी ठरला आहे. एका इन्स्टा पोस्टसाठी विराट कोहली 5 कोटी रुपये तर बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा 3 कोटी रुपये मानधन आकारते.
हॉपर इन्स्टाग्राम रिच लिस्टमध्ये जगभरातील टॉप 20 सेलिब्रेटीमध्ये स्थान मिळवणारा विराट हा एकमेव हिंदुस्थानी सेलिब्रेटी ठरला आहे. गतवर्षी याच यादीत तो 23व्या स्थानावर होता. इन्स्टाग्रामवर विराटचे तब्बल 125 मिलियन फॉलोअर्स आहेत. दुसरीकडे प्रियांका चोप्रा या यादीत 27व्या क्रमांकावर आहे. गतवर्षी ती यादीमध्ये 19व्या स्थानावर होती. तिचे इन्स्टाग्रामवर 64 मिलियन फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामच्या टॉप 100 सेलिब्रेटीमध्ये ती एकमेव बॉलिवूड सेलिब्रेटी आहे.
इन्स्टाग्रामवर बक्कळ कमाई करणाऱयांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर नाव आहे ते म्हणजे पोर्तुगालचा कर्णधार आणि स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो. रोनाल्डोचे सोशल मीडियावर करोडो चाहते आहेत. रोनाल्डो एका इन्स्टा पोस्टसाठी जवळपास 12 कोटी रुपये घेतो.























































