पुण्यात अल्पवयीन मुलींवर टाकला जातोय डाव, मुलींना फूस लावून पळविण्याचे प्रमाण वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवनाथ शिंदे

पुणे शहरात अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पळवून नेल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे पालकांसह पोलिसांसमोर अल्पवयीन मुलींना शोधून काढण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पुण्यातून दिवसाला सरासरी दोन मुलींना फूस लावून पळवून नेले जात आहे. फूस लावून पळवून नेलेल्या मुलींमध्ये सर्वाधिक 14 ते 17 वयोगटातील मुलींचा समावेश आहे. त्यामुळे सांस्कृतिक राजधानी असलेल्या शहरातून अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याच्या घटना वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यामुळे चोवीस तासानंतर पोलिसांकडून अपहरणाची तक्रार दाखल केली जाते. त्यानंतर पालक किंवा पोलिसांकडून मुलीचा शोध घेतल्यानंतर ती मित्रासोबत पळून गेल्याचे उघडकीस येते. त्यानंतर संबंधिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येतो. मात्र, काही प्रकरणामध्ये पोलिसांकडून मुलीचा शोध घेऊन तिला पालकांच्या ताब्यात दिले जाते. पुण्यात दिवसेंदिवस मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे मुलीच्या पालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, बदनामी आणि मुलीच्या भविष्यासाठी काही पालक तडजोड करण्यास तयार होता. त्यामुळे दाखल केलेले गुन्हे देखील मागे घेतले जातात. तरूणांकडून अल्पवयीन मुलींना प्रेमाचे जाळे टाकून पळवून नेले जात आहे. त्यामध्ये 14 ते 17 वयोगटातील सर्वाधिक मुलींचा समावेश असल्याचे दिसून आले आहे.

आजूबाजूचा परिसर, वातावरण आणि शारीरिक बदलांमुळे अल्पवयीन मुली सहज प्रेमाच्या जाळ्यात ओढल्या जातात. त्याशिवाय सोशल मिडीया, चित्रपटांमधील आकर्षणाचा त्यांच्यावर परिणाम होतो. त्यामुळे मुली पालकांचा विचार न करता पळून जाण्यात तयार होतात. मात्र, यानंतर त्यांच्या आयुष्यात पुढे काय आहे, याची त्यांना कल्पना येत नाही. काही मुलीनंतर त्या मुलासोबत लग्न करून संसार करतात. पण, काहींना आयुष्यभर या घटनेचा पश्चात्ताप करण्याची वेळ येत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, मुलगी पळून गेल्यानंतर तिचे मुलासोबत संबध आल्याचे आढळून आल्यास बाल लैंगिक अत्याचारानुसार गुन्हा दाखल केला जातो. पण, अशा गुन्ह्यात मुलीच्या भविष्याचा विचार करून पूर्वी पालकांनी प्रतिज्ञापत्र दिले जात होते. काही गुन्ह्यात पालक फितूर झाल्यास गुन्ह्यात पुढे काहीच होत नव्हते. मात्र, न्यायालयाने अशी प्रकरणे गांभीर्याने घेतले आहेत.

पालकांच्या दुर्लक्षामुळे घटनांमध्ये वाढ

नोकरी आणि व्यवसायासाठी पालक कामासाठी बाहेर पडतात. मात्र, त्यांना स्वतःची मुले काय करतात, याच्याकडे त्यांचे लक्ष नसते. पालकांचा मुलांसोबतचा संवाद कमी होत आहे. त्यामुळे कामावरून आल्यानंतर सतत मुलांवर ओरणे, चिडचिड करणे या कारणांमुळे मुले पालकांपासून दूर जातात. त्यामुळे मुलांना पालकांकडे मन मोकळे करता येत नसल्याचे दिसून आले आहे. पालकांनी चाणाक्षपणे लक्ष ठेवल्यास अल्पवयीन मुली घरातून पळून जाण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. प्रत्यक्षात मात्र, शाळा, महाविद्यालय, प्रवासादरम्यान अनेकांकडून मुलींचा पाठलाग करणे, त्यांना त्रास देणे, छेडछाड केल्याच्या घटना घडत आहेत. परंतु, बदनामी टाळण्यासाठी मुलींकडून मुकपणे अन्याय सहन केल्याचेही दिसून आले आहे.

शहरात अल्पवयीन मुलींना फूस लावून नेण्याच्या घटना

सन      पळवून नेलेल्या अल्पवयीन मुली
2017           446

2018           461

2019           311

2020           338

2021           237 (मे अखेर)