
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे नगारे वाजायला सुरुवात झाली असून आता या क्रीडा महोत्सवासाठी जेमतेम 19 दिवस उरले आहेत. क्रीडा विश्वातील खेळाडू हळूहळू ऑलिम्पिकच्या क्रीडाग्राममध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र कोरोनाच्या संकटाची आणखी एक बातमी समोर आली आहे. सर्बियाच्या ऑलिम्पिक संघातील एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. जपानच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी ही माहिती दिली. याआधी युगांडा संघातील दोन खेळाडूही जपानमध्ये दाखल झाल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकवर कोरोनाचे संकट कायम असल्याने पुढील पावले अतिशय सावधपणे टाकण्याची गरज निर्माण झाली आहे.
रोइंग संघाचा खेळाडू पॉझिटिव्ह
सर्बियाच्या रोइंग संघाच्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. टोकियोतील हनेडा विमानतळावरच झालेल्या कोरोना टेस्टमध्ये तो पॉझिटिव्ह आढळला. त्या खेळाडूला विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे. शिवाय त्याच्यासोबत प्रवास करणाऱया चार खेळाडूंनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. सर्बियन खेळाडूंचा पूर्वनियोजित सरावही रद्द करण्यात आला आहे.
युगांडाच्या दोन खेळाडूंना कोरोना
मागील महिन्यात युगांडाच्याही दोन खेळाडूंना जपानमध्ये दाखल झाल्यानंतर कोरोना झाला होता. यातील एक जण नरिता विमानतळावरच पॉझिटिव्ह सापडला, तर दुसरा खेळाडू ओसाकामध्ये गेल्यावर पॉझिटिव्ह आढळला. ऑलिम्पिकची रणधुमाळी तोंडावर आली असताना खेळाडूंना कोरोनाची लागण होत राहिली तर परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही.
प्रेक्षक संख्येला कात्री?
कोरोनाच्या संकटामुळेच जपानी नागरिकांनी टोकियो ऑलिम्पिकला विरोध केला होता. मात्र आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि स्पर्धा आयोजकांनी या स्पर्धेच्या आयोजनासाठी कंबर कसली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून काही ठिकाणांवर प्रेक्षकांना बंदी करण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचबरोबर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली तर नाइलाजाने प्रेक्षक संख्याही कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो. स्पर्धा आयोजकांनी प्रेक्षकसंख्या 10 हजारांहून 5 हजार करण्याचा विचार सुरू केल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.




























































