कोविडमुक्त क्षेत्रातील शाळा-कॉलेज उघडणार; आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना नियंत्रणात येत असल्याने शाळा आणि महाविद्यालये लवकरच उघडणार आहेत. राज्य सरकारने कोविडमुक्त क्षेत्रातील शाळा–महाविद्यालयांना आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कोविडमुक्त ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या हद्दीतील गावांमधील शाळा–महाविद्यालयांतील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.

शालेय शिक्षण विभागाने आज यासंदर्भात अध्यादेश जारी केला. शाळा-महाविद्यालयांमधील वर्ग पुन्हा सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने काही निकष ठरवून दिले आहेत. त्यांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. गर्दी टाळता यावी आणि सुरक्षित अंतर राखता यावे यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दिवशी, सकाळी-दुपारी टप्प्याटप्प्याने बोलावण्यात यावे. वर्ग सुरू करताना महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य देण्यात यावे असे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यामध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास त्याला तातडीने घरी पाठवण्यात यावे आणि त्याची कोरोना चाचणी करण्यात यावी असेही नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती बंधनकारक नसून ती पूर्णपणे पालकांच्या संमतीवर अवलंबून असणार आहे.

आरोग्य, स्वच्छतेबाबत मार्गदर्शक सूचना

  • शाळा-महाविद्यालयात हात धुण्यासाठी सुविधा असावी.
  • थर्मेमीटर, जंतुनाशक, साबण उपलब्ध असावा.
  • निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाने करावे.
  • शाळांमधील क्वारंटाईन सेंटर्स इतरत्र हलवावीत.
  • क्वारंटाईन सेंटर हलवता येत नसेल तर शाळा इतरत्र भरवावी.
  • थुंकण्यावरील बंदीचे काटेकोर पालन करावे
  • शाळेच्या आत आणि बाहेरच्या परिसरात सुरक्षित अंतर राखण्यासाठी चिन्हे आणि चौकोन, वर्तुळाचा वापर करावा.
  • गर्दी होणाऱया कार्यक्रमांचे आयोजन टाळावे
  • …या नियमांचे पालन सक्तीचे
  • एका बाकावर एकच विद्यार्थी
  • दोन बाकांमध्ये 6 फुटांचे अंतर
  • एका वर्गात कमाल 20 विद्यार्थी
  • सतत साबणाने हात धुणे
  • मास्कचा काटेकोरपणे वापर
  • कोणतेही लक्षण आढळल्यास विद्यार्थ्याची
    तातडीने चाचणी

शिक्षकांना गावातच राहावे लागणार

शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकवण्यासाठी येण्यापूर्वी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांना कोरोना आरटीपीसीआर किंवा रॅपिड ऑन्टिजन चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांना आपली शाळा असलेल्या गावातच राहावे लागणार आहे.

पालकांनाही दक्षता  घेण्याच्या सूचना

पालकांनाही दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आजारी असलेल्या किंवा लक्षणे असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. कुटुंबातील व्यक्तींनीही नियमितपणे वाफ घेणे व अन्य दक्षता घ्यावी.