
पुण्याचा मराठमोळा गोल्फपटू उदयन माने याला टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले आहे. अनिर्बान लाहिरी याच्यानंतर टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला उदयन माने हा दुसरा हिंदुस्थानी पुरुष गोल्फपटू होय. अर्जेंटिनाच्या एमिलियानो ग्रिलोने क्वाड्रेनियल इव्हेंटमधून माघार घेतल्यामुळे 30 वर्षीय उदयन माने
हा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला.
अर्जेंटिनाच्या एमिलियानो ग्रिलोने 24 जूनला क्वाड्रेनियल इव्हेंटमधून माघार घेतली. त्याच वेळी उदयन मानेचे ऑलिम्पिकचे तिकीट जवळपास पक्के झाले होते. मात्र आंतरराष्ट्रीय गोल्फ फेडरेशनची यादी अपडेट होईपर्यंत उदयन मानेला निर्णयाची प्रतीक्षा करावी लागली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही स्पर्धांना मुकावे लागल्याने आपली टोकियो ऑलिम्पिकची वारी हुकणार असेच वाटत होते. मात्र अखेरच्या क्षणी ऑलिम्पिकचे तिकीट मिळाल्याने साहजिकच आनंद झालाय.
चेन्नईमध्ये जन्मलेला उदयन माने सध्या पुण्यात राहतो. 2015पासून तो ‘पीजीटीआय’मधील सर्वांत यशस्वी गोल्फ खेळाडूंपैकी एक आहे. त्याने ‘पीजीटीआय’मध्ये तब्बल 11 वेळा विजेतेपद पटकावले आहे.




























































