तरुणीची बदनामी करणाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नाला नकार दिल्याने तरुणीचे फोटो सोशल मीडियावर टाकून तिची बदनामी करणाऱ्याला कुरार पोलिसांनी अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते.

तक्रारदार तरुणी या मालाड पूर्व परिसरात राहतात. काही महिन्यांपूर्वी त्यांची अटक आरोपीसोबत ओळख झाली होती. त्याने जबरदस्तीने तरुणीसोबत नकोसे कृत्य करत तिचे फोटो काढले होते. ते फोटो काढून तो तिला वेळोवेळी धमकावत असायचा. तरुणीने त्याला लग्नाला नकार दिला होता. नकार दिल्याने अटकेत असलेल्या आरोपीने सोशल मीडियावर बनावट अकाऊंट उघडून तरुणीचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. तरुणीचा एक फोटो तिच्या नातेवाईकाला दिसला. त्याने याची माहिती त्या तरुणीला दिली. घडल्याप्रकरणी तरुणीने कुरार पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरुणीच्या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. अटक आरोपी हा पुण्याला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कुरार पोलिसांचे पथक पुण्याला गेले, तेथून त्याला अटक करून मुंबईत आणले.