
मागील काही दिवसांपासून शहर परिसरात विविध कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क अचानक कट होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. फोनवर बोलताना अचानक संभाषण ऐकू न येणे, नेटवर्क नसणे असे प्रकार वाढत आहेत. महिन्याकाठी भरमसाट पैसे मोजूनदेखील ग्राहकांना योग्य सेवा मिळत नाही. सोलापूर शहरातील काही भागांत तर हा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार नेटवर्क व कॉल ड्रॉपमुळे ग्राहक हैराण झाले आहेत.
पूर्वी काही विशिष्ट कंपन्यांपुरती मर्यादित असणारी ही समस्या आता सर्वच मोबाईल कंपन्यांमध्ये दिसून येत आहे. मोबाईल ग्राहकांना अनेक महिन्यांपासून कॉल ड्रॉपच्या समस्येचा सामना करावा लागत आहेत. एखाद्याशी फोनवर चर्चा करीत असताना विनाकारण आणि अचानक फोन बंद होतो. महत्त्वाचा फोन मध्येच कट होऊ नये म्हणून नेटवर्क असलेल्या ठिकाणी जाण्याकरिता अनेकांची धावपळ होत आहे. मात्र, याचाही फारसा उपयोग होत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. कंपन्यांच्या इन्कमिंग आउटगोइंग, लोकल, एसटीडी या सर्वच सेवांवर ग्राहकांना कॉल ड्रॉपचा अनुभव येत आहे.
‘वर्क फ्रॉम होम’ कामातही अडचण
कोरोनामुळे अनेक कंपन्यांनी ऑफिस सुरू केले नाही. त्यामुळे पुणे, मुंबईसह स्थानिक कंपनीत ‘वर्क प्रॉम होम’ करणाऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. घरूनच ऑनलाइन काम करताना नेटवर्क जाण्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. ऑफिसच्या वेळात नेटवर्क समस्या झाल्यास मनस्ताप सहन करावा लागतो. बराच वेळ वाया जातो आणि बसून राहावे लागते. दिवसा नेटवर्क समस्या असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते. यामुळे आरोग्य व कामावर याचा परिणाम होत असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या आहेत.
ऑनलाइन शाळांनाही बसतोय फटका
दोन वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्र ऑनलाइन सुरू झाले आहे. सध्यातरी दोन ते तीन तास शाळांचे वर्ग सुरू होत आहेत. ऑनलाइन वर्गात पूर्वीच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण कमी आहे. त्यात वारंवार नेटवर्क गायब होत असल्याची प्रमुख अडचण ठरत आहे. ऑनलाइन क्लास सुरू असताना अचानक नेटवर्क गायब होत आहे. त्यामुळे शिक्षकांची शिकविण्याची लिंक तुटते, तर मुलांचे लक्ष विचलित होते आणि त्या शिक्षकांना वारंवार एकच गोष्ट वारंवार सांगावी लागते. यात बराच वेळ वाया जात असल्याचे शिक्षकांनी सांगितले. विद्यार्थ्यांनाही क्लास जॉइन करण्यात अडचणी येत असून, ऑनलाइन शिक्षणाचा फज्जा उडाला आहे.
































































