
काँग्रेस अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळून आली असून राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली. राऊत यांच्यासोबतच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही दिल्लीत काही नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्याने काँग्रेसमधली गटबाजी भविष्यात अधिक उफाळण्याची चिन्हे आहेत.
विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले होते. मात्र, नानांचा प्रदेशाध्यक्षपदाबरोबरच मंत्रिपदावरही डोळा असल्याची काँग्रेसच्या वर्तुळात चर्चा आहे. त्याच अनुषंगाने नाना पटोलेंनी विदर्भातील नेते व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या ऊर्जा खात्यातील भ्रष्टाचाराबाबत आवाज उठविला होता. राऊतांना विधानसभाध्यक्ष करून ऊर्जामंत्री पद मिळविण्याच्या दृष्टीनेही नाना पटोलेंनी प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. त्यातूनच पटोले व राऊत यांच्यात वादाची ठिणगी पेटली आहे.
जातीपातीचे संदर्भ
काँग्रेसमधली प्रस्थापित मराठा लॉबी दलित व ओबीसींना दुय्यम वागणूक देत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही हायकमांडकडे राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आल्या होत्या. दलित असल्यानेच आपल्याला टार्गेट केले जात असल्याचा नितीन राऊत यांचा दावा आहे तर, आपला दावा असतानाही केवळ जातीपातीचे संदर्भ पाहून महसूलमंत्रीपद आपल्याला दिले गेले नाही, असा दावा करत ओबीसी नेते व विद्यमान मंत्री विजय वड्डेटीवार यांनी खळबळ उडवून दिली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी वडेट्टीवार व के. सी. पडावी हे काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते होते. मात्र, सत्ता आल्यानंतर महत्त्वाची खाती केवळ मराठा नेत्यांना देण्यात आली, असा या नेत्यांचा आक्षेप आहे, त्यावरून काँग्रेसमध्ये बऱयाच दिवसांपासून खदखद आहे. दलित, आदिवासी समाज ही काँग्रेसची मतपेढी असताना राज्यातील प्रस्थापित नेत्यांकडून या समाजातील नेत्यांवर अन्याय होत असल्याबद्दल राऊत यांनी हायकमांडला अवगत केल्याचे समजते. नितीन राऊत यांनी आज दहा जनपथवर जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली. सुमारे 25 मिनिटे चाललेल्या या भेटीत राऊत यांनी, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसह इतर अनेक मुद्दय़ांवर चर्चा केली.
























































