
>> प्रसाद ताम्हनकर
सध्या इंटरनेटवर बांगलादेशच्या परकीय चलनावर सायबर दरोडेखोरांनी कसा डल्ला मारला याची एक थरारक कथा भरपूर शेअर होते आहे. अनेक वाचकांना ही एखाद्या चित्रपटाची कथा वाटते आहे, तर अनेकांना बनावट कहाणी. पण ही सत्यकथा असून 2016 सालात या धाडसी दरोडय़ाने सगळ्यांनाच थक्क केले होते. हा धाडसी दरोडा प्रचंड चर्चेत येण्याचे कारणदेखील होते. तंत्रज्ञानाच्या बाबतीत अत्यंत मागास मानल्या गेलेल्या उत्तर कोरियाच्या हॅकर्सनी हा अत्यंत डोकेबाज असा हल्ला घडवून आणला होता आणि त्याद्वारे बांगलादेशसारख्या देशाच्या संपूर्ण परकीय चलनाच्या गंगाजळीला लुबाडण्याचा त्यांचा डाव होता. त्यात ते 95 टक्के यशस्वीदेखील झाले असे म्हणायला हरकत नाही.
आजवरच्या अत्यंत धाडसी अशा मानल्या गेलेल्या सायबर हल्ल्यांपैकी एक असलेल्या या हल्ल्याची तयारी जवळजवळ वर्षभर आधीपासून सुरू असल्याचे नंतरच्या तपासात स्पष्ट झाले होते. या हल्ल्याची सुरुवातदेखील अत्यंत साध्या-सोप्या पद्धतीने झाली. एका बँकेच्या प्रिंटरमध्ये अचानक तांत्रिक समस्या निर्माण झाली आणि त्याचे काम ठप्प झाले. तुमच्या माझ्यासारखा सामान्य जीव करतो, तेच बँकेतल्या कर्मचाऱयांनी केले. ‘असेल काही एक लहान समस्या, होईल चालू’ असा विचार त्यांनीदेखील केला आणि समस्येकडे सरळ दुर्लक्ष केले. पण हे दुर्लक्ष पुढे जाऊन अत्यंत महागात पडणार होते. कारण ही कोणती साधीसुधी बँक नव्हती, ती होती देशाच्या अमूल्य अशा परकीय चलनाची देखरेख ठेवणारी बांगलादेशची मध्यवर्ती बँक – बांगलादेश बँक. याच बँकेच्या दहाव्या मजल्यावर अत्यंत सुरक्षित बंदोबस्तात असलेला प्रिंटर काम करायला नकार देत होता.
शुक्रवार 5 फेब्रुवारी 2016 सकाळी साधारण 8.45 च्या सुमाराला हा बँकेत येणाऱया आणि बँकेतून बाहेर जाणाऱया करोडो रुपयांच्या व्यवहाराच्या नोंदींची प्रिंट आऊट काढणारा प्रिंटर खराब झाला होता. याआधीदेखील काही वेळा अशी समस्या निर्माण झालेली असल्याने बँकेच्या कर्मचाऱयांनी फारसे लक्ष दिले नाही, पण हे प्रिंटरचे बंद पडणे म्हणजे खरे तर हॅकर्सनी बँकेच्या कॉम्प्युटर नेटवर्कला भगदाड पाडल्याची निशाणी होती. आणि या सगळ्यामागे हॅकर्स ग्रुपचे उद्दिष्ट होते, बांगलादेशचे तब्बल एक अब्ज डॉलर्स हडप करण्याचे.
हा प्रिंटर रिबूट करण्यात आल्यानंतर बँकेच्या अधिकाऱयांना फक्त चक्कर यायचीच बाकी राहिली किंवा कदाचित आलीदेखील असावी. कारण हा प्रिंटर रिबूट करताच, त्यांना अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या ‘फेडरल रिझर्व्ह’कडून गोपनीय आणि तातडीचे मेसेजेस मिळायला लागले. बांगलादेशचे अमेरिकन डॉलर्सचे खाते ‘फेडरल रिझर्व्ह’मध्येच आहे. हे खाते पूर्णपणे रिकामे करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने ‘फेडरल रिझर्व्ह’ने बांगलादेश बँकेशी संपर्क साधला होता. आता बांगलादेश बँकेच्या अधिकाऱयांनी तातडीने ‘फेडरल रिझर्व्ह’बरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही. हा संपर्क न होण्याचे कारण म्हणजे, हॅकर्सनी अत्यंत डोकेबाजपणे केलेला वेळेचा आणि दिवसांचा वापर. या सायबर हल्ल्यासाठी जी वेळ निवडण्यात आली होती, त्यातच खरी गोम दडलेली होती. गुरुवारी संध्याकाळी जेव्हा हॅकर्सनी त्यांच्या कामाला सुरुवात केली तेव्हा न्यूयॉर्कमध्ये मात्र गुरुवारची सकाळ होती. बांगलादेश जेव्हा झोपी गेला तेव्हा ‘फेडरल रिझर्व्ह’चे काम मात्र सुरूच होते आणि बांगलादेश बँकेद्वारे मिळणाऱया कॉम्प्युटर आदेशांद्वारे बांगलादेशच्या खात्यातील डॉलर्स हस्तांतरण व्हायला सुरुवातदेखील झाली होती.
दुसऱया दिवशी शुक्रवार असल्याने बांगलादेशात साप्ताहिक सुट्टी होती जी शनिवारपर्यंत चालते. त्यामुळे जेव्हा शनिवारी बांगलादेश बँकेच्या अधिकाऱयांनी या चोरीचा माग घ्यायला सुरुवात केली, तेव्हा न्यूयॉर्कमध्ये साप्ताहिक सुट्टी सुरू झालेली असल्याने गोंधळ उडाला. कारण ‘फेडरल रिझर्व्ह’ बंद होती. त्यामुळे या चोरीचा तपास करण्यासाठी तब्बल तीन दिवसांचा विलंब झाला. मधल्या काळाचा फायदा घेऊन हॅकर्सनी फिलिपिन्सच्या राजधानीमध्ये उघडलेल्या आपल्या बँक खात्यात हे डॉलर्स पाठवायला सुरुवातदेखील केली होती. सोमवार 8 फेब्रुवारी 2016 हा राष्ट्रीय सुट्टीचा दिवस असल्याने हॅकर्सला 5 दिवसांचा सुकाळ मिळाला आणि त्यांनी या धाडसी दरोडय़ाला मूर्त स्वरूप दिले.
‘एफबीआय’च्या सांगण्यानुसार या सगळ्या प्रकरणात उत्तर कोरिया हा देश प्रमुख संशयित असून, जगभर पसरलेल्या काही उत्तर कोरियन हॅकर्सना एकत्र करून हा दरोडा टाकण्यात आला. या हॅकर्सच्या ग्रुपला उत्तर कोरिया प्रशासनाची मदत मिळत होती. सायबर सिक्युरिटीच्या क्षेत्रात या उत्तर कोरियन हॅकर्सच्या ग्रुपला ‘लाझरस (Lazarus)’ म्हणून ओळखले जाते. बायबलनुसार मृत्यूनंतरही जो पुन्हा जिवंत होऊन या जगात परत येतो तो, असा अर्थ होतो. सध्या जागेअभावी इथेच थांबतो. या गुन्हेगारांचा माग कसा काढला, या पैशाचे काय झाले हे पुन्हा कधीतरी.


























































