
>> अरुणा सरनाईक
देवाच्या देण्यातील एक सुंदर, ओलतं, हिरवं देखणं शिल्प म्हणजे पाऊस! त्याचे प्रकार तरी किती? तो वेड लावणारा घननीळ आहे. निळ्याकाळ्या मेघातले ते अमृत आहे. पाऊस न आवडणारा विरळाच कोणी असावा. असं वाटतं, हिरव्या वनराईतला त्याचा नूर वेगळा… पर्वतशिखरावरचा तोरा वेगळा… सागराच्या उदरात रिता होणारा समर्पित पाऊस वेगळा आणि नदीच्या अवखळ नाचऱया प्रवाहात भोवरे फिरवणारा निरागस पाऊस वेगळा. कुठंतरी दूर रानात पडला तरी आपल्या आगमनाची तो मृदगंधानं वार्ता ही देणारच! किती त्याच्या रूपाची अपूर्वाई वर्णावी! अगदी अरसिक माणूसदेखील त्याच्या पहिल्यावहिल्या स्पर्शानं सुंखावतो! ही निसर्गाची अवर्णनीय देणगी दरवर्षी आपण भोगतो.
पावलापावलावर उन्हाला सावरणारा असा हा पाऊस! ग्रीष्माची तलखी मिटवणारा पाऊस! बळीराजाच्या डोळ्याला शांतवणारा पाऊस! आकाशाच्या हृदयाच्या तळापासूनचा जिव्हाळ ओलावा असणारा पाऊस! प्रियकराच्या अनुरागासारखं चहुअंगानी आलिंगित करणारा गात्रागात्रात तृप्तीचा गारवा भिनवणारा पाऊस! किती त्याचं वर्णन करावं… शब्द तोकडे पडतील. अनुभव कधीच जुना न होऊ देणारा पाऊस! दरवर्षी त्याच्या वेल्हाळपणावर जीव जडावयाला भाग पाडणारा पाऊस… कालिदासाच्या आरोपी, शिक्षा भोगत असलेल्या यक्षाला, आपल्या प्रेयसीला मेघाला दूत करावयास प्रवृत्त करावयाला लावणारा पाऊस! एका सुदंर आणि मनोज्ञ महाकाव्याला, मेघदूतला जन्माला आणण्यास कारण ठरलेला पाऊस! कालिदासाच्या काव्यप्रतिभेला उच्चांकावर नेणारा पाऊस!
त्याचं काय वर्णन करावं? किती त्याची वाट बघणं! डोळ्यात पाणी आणून शरीराला, धात्रीला गारवा दे अशी विनवणी करून घेणारा पाऊस! देवाच्या देण्यातील एक सुंदर, ओलतं, हिरवं देखणं शिल्प म्हणजे पाऊस! त्याचे प्रकार किती! त्याची रूपं तरी किती! कधी अलवार तर कधी नाचरा, कधी अबोध बालकासारखा! कधी मुजोर! तर कधी प्रलयकारी शिवासारखा कोणत्याही उपायानं शांत न होणारा! कधी रानातला, मोकाट सुटलेल्या वासरासारखा! तर गरत्या बाईसारखा निमूटपणे पडणारा! कधी नुस्ताच आरडाओरडा करीत येणार येणार करत वाजतगाजत येणाऱया नवर-देवासारखा! तर कधी दिवसेंदिवस दडी मारून लपलेल्या मुलासारखा! पण तो हवासाच असतो.
कुठंतरी दूर रानात पडला तरी आपल्या आगमनाची तो मृदगंधानं वार्ता ही देणारच! मुकाटपणे तो येत नाहीच. ताशावाजंत्री ही वाजणारच. काय सुंदर देखावा असतो त्याच्या आगमनापूर्वीचा… निळंभोर आकाश उदी रंगाचं होत पांढरेशुभ्र बगळे अधिकच शुभ्र दिसू लागतात… हिरवी झाडं अधिकच हिरवी आणि आतूर होतात… घरावरील काचेची तावदानं चंदेरी रंगानं चमकू लागतात. उघडय़ा माळरानावर धुळीचे लोट आकाशाला गवसणी घालू पाहतात. जणू आपल्या धूळभरल्या हातानं ते पावसाला कवेत घेऊ पाहतात. रस्त्यावर मुलांचा, खेळाचा डाव रंगू लागतो. ऑफिसातली कृत्रिम गारव्याची साधनं आपोआपच बंद करून सारं ऑफिस टेरेसवर गोळा होऊ लागतं… घरातले आजोबा-आजी आपापल्या खुर्च्या एकमेकांच्या नजरा चुकवत व्हरांडय़ात आणतात. जुन्या आठवणींचं गाठोडं त्याच्याही नकळत हळूच त्यांच्या पायाशी टेकतं… मध्यमवयीन मुलगा आईबाबांची लगबग बघून आपलीही खुर्ची बाहेर आणतो आणि स्वयंपाकघराचा कानोसा घेत बाबांना कांदा-भजी खायची आहेत, करतेस का, असं प्रेमानं विचारतो. आजचा मौसम आणि व्हरांडय़ातील जमलेली मैफील पाहून स्वयंपाकघर कांदा चिरायला घेतं! अशी सगळी तयारी पाहून आकाशातला पाऊस धरतीवर उतरायचं ठरवतो आणि मग तो येतो सर्वांना चिंब चिंब करतो…
ही निसर्गाची अवर्णनीय देणगी दरवर्षी आपण भोगतो. तारुण्याचं आणि पावसाचं तर अगदी जिवाभावाचं नातं! तो ते आर्वजून निभावतो. प्रत्येक प्रेमात पडलेल्यांना आपली ती अगदी मधुबाला वाटते. पाऊस आणि मधुबालाचं नातं जन्मजन्मांतरीचं आहे. वर्ष उलटलीत पण ओलेती मधुबाला तशीच राहील. तसे सगळेच ऋतू आपले आवडीचे. पण त्यांचा येणारा क्रम देवानं ठरविलेला आहे. आधी येणारा तो उन्हाळा चैत्रपाडव्यापासून तो सुरू होतो. त्या वेळी मन त्याचं आनंदानं स्वागत करतो. हळूहळू उष्मा पाढीला लागतो. त्या वेळीदेखील वळवाच्या पावसाची एखादी अवखळ सर गारवा देतेच देते.
अगदी ऐन थंडीतसुद्धा क्वचित हजेरी लावणारा पाऊस सर्वांनाच आवडतो. कारण मुळातच त्याच्यावर सर्वांचा फार जीव असतो. त्याचं अपार आकर्षण आहे. तो वेड लावणारा घननीळ आहे. निळ्याकाळ्या मेघातले ते अमृत आहे. पाऊस न आवडणारा विरळाच कोणी असावा. असं वाटतं हिरव्या वनराईतला त्याचा नूर वेगळा… पर्वतशिखरावरचा तोरा वेगळा… सागराच्या उदरात रिता होणारा समर्पित पाऊस वेगळा आणि नदीच्या अवखळ नाचऱया प्रवाहात भोवरे फिरवणारा निरागस पाऊस वेगळा… किती त्याच्या रूपाची अपूर्वाई वर्णावी!
कवीच्या कवितांचा तो तर कायम महत्त्वाचा विषय ठरलेला असतो. कधी तो त्यांचा सखासाजण तर कधी बेदर्द, जालीम रसिया असतो. कधी प्रियकराचा संदेश घेऊन येणारा मित्र असतो. लोकगीतात या सगळय़ा भावभावनांचा सुंदर आविष्कार बघायला मिळतो. अगदी प्राचीन कवींपासून तर आजचे कवी सगळेच पावसाच्या प्रेमात आकंठ आहेत. देवानं अनेक नजराणे आपल्याला दिलेत. ते आपण कसे स्वीकारतो ते आपल्या मनोवृत्तीवर अवलंबून असतं. त्यात आपार भाव नसतो… हा माझा, हा परका असा फरक नसतो. तो एकदिलानं सर्वांना सारखं देतो… पाऊस तर उघड सत्य आहे… तो किंचित निलाजरा आहे. तो कुणालाही कसाही कुठेही भिजवतो. तसाच तो सर्वसमावेशक आहे. आपल्या बरसण्यात अनेकाचं दुःख वाहून नेतो. त्यांना हलकं करतो. म्हणून म्हणावसं वाटतं,
तुझं, रे बरं असतं दाटून आलं की मोकळं होणं!
कोणाच्याही संमतीची तुला गरज भासत नाही,
मोठय़ा अधिकारानं तर कधी बळजबरीनं तू,
आपल्या रंगात भिजवून टाकतोस. अगदी नखशिखांत!
मी मात्र, माझं – याचं, हवं-नकोच्या संभ्रमांत बंदिस्त!
मनात आलेलं मनातच जिरवत!
कधी उठेल गदारोळ, जर मी व्यक्त व्हायचं ठरवलं तर?
पण खरं सांगू? तू जेव्हा मोकळा होतोस ना
तेव्हाच मी स्वतःला बांधून घेते तुझ्यात
आणि मग समर्पित करते
माझं कोंडलेल मन, तन तुझ्या मोकळं होण्यात!
तुझ्यातून मला ओळखताना एकच खुणगाठ पक्की,
तुझ्या साऱया मधुर शीत जलधारांत
एकांडी एकच सर फक्त कढत अन् खारी!





























































