
लातूर जिल्ह्यातील शेतकरी सध्या हरणांच्या उपद्रवामुळे त्रासून गेले आहेत. काही भागात तर शेतकरी रात्र ही शेतावर जागून काढत आहेत. सध्या सोयाबीन, तूर, मुग, उडीद ही पिके उगवलेली आहे. परंतु ही पिके हरणे फस्त करीत आहेत.
लातूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात हरणांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सध्या सोयाबीन, तूर, मुग, उडीद ही पिके उगवून आलेली आहेत. कोवळी पिके हरणांचे कळप फस्त करीत आहेत.सर्वात लहान कळप म्हणजे किमान 12 ते 15 हरणांचा आहे तर काही भागात 50 पर्यंतचा हरणांचा कळप दिसून येत आहे.
मध्यंतरी पावसाने ओढ दिल्याने शेतकरी त्रस्त झालेले होते. आता पाऊस सुरु झाला आहे, पिकांची उगवणही चांगली झालेली आहे परंतू हरणांचे कळप हे पिक खाऊन फस्त करीत आहेत.
अहमदपूर तालुक्यातील हडोळती परिसरातील गावामध्ये सोयाबीन, मुग आदी खरीप पिकाचे हरिणामुळे नासाडी होत असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
हडोळती व परिसरातील खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून मुख्य पीक म्हणून सोयाबिन पिकाची लागवड जास्त प्रमाणात झाली असून परंतू शेत शिवारामध्ये पन्नास ते साठ हरणांचा एक कळप प्रमाणे धुमाकूळ घालत असून आलेल्या पिकाचे शेंडे खात आहेत परिसरातील दहा ते पंधरा गावामध्ये हे कळप फीरत आहेत.
बरेच शेतकरी रात्र जागून पिकाची राखण करीत आहेत पिकाची नासाडी होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या वन्य प्राण्याचा वन विभागाने कायम बंदोबस्त करावा आशी मागणी शेतकरी करीत आहेत.




























































