दिलासादायक! म्युकर मायकोसिसचा धोका टळला, एकूण 436 रुग्णांना डिस्चार्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असतानाच मुंबईत जीवघेणा म्युकर मायकोसिसही आटोक्यात आल्याने धोका टळला आहे. मुंबईत उपचारासाठी दाखल झालेल्या 804 रुग्णांपैकी 436 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 212 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. सक्रिय रुग्णांमध्ये मुंबईचे केवळ 70 सक्रिय रुग्ण आहेत.

डोळे, नाक आणि मेंदूवर हल्ला करणाऱया या बुरशीजन्य आजारामुळे जिवालाही धोका निर्माण होतो. कोरोना उपचारात अतिप्रमाणात घेतलेली स्टिरॉइड, टोसिलॅझुमॅबच्या अतिवापरामुळे हा आजार होत असल्याचे आरोग्यतज्ञ सांगतात. म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळू लागल्यानंतर पालिकेने ‘टास्क फोर्स’ने ठरवून दिलेल्या प्रोटोकॉलनुसार यंत्रणा उभारून काम केले. म्युकर मायकोसिस रुग्णांवर पालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि कूपर रुग्णालयासह खासगी रुग्णालयांतही उपचार सुरू आहेत. या आजारावर प्रभावी असणारे इंजेक्शन एम्फोटेरेसिन-बी लॅपोझोम आणि टॅबलेट पोसोकोनेझोल वापरले जात आहेत. गरज भासल्यास नाक आणि डोळ्यांवर शस्त्रक्रिया करून इन्फेक्शन काढून टाकण्यात येत असून रुग्णांकडून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. मुंबईत उपचार घेणाऱया रुग्णांमध्ये केवळ 30 टक्के रुग्ण मुंबईचे असल्याची माहितीही त्यांनी दिली.

अशी आहे सद्यस्थिती

  • मुंबईत आतापर्यंत पालिका आणि खासगी रुग्णालयांत म्युकर मायकोसिसचे 804 रुग्ण दाखल झाले. यातील 156 जणांचा म्युकर मायकोसिसमुळे मृत्यू झाला आहे. तर सद्यस्थितीत 212 सक्रिय रुग्ण आहेत.
  • मुंबईत आतापर्यंत म्युकर मायकोसिसचे एकूण 232 रुग्ण आढळले. यातील 47 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत 115 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून केवळ 70 सक्रिय रुग्ण आहेत.
  • मुंबईत मुंबईबाहेरचे 532 रुग्ण दाखल झाले. यातील 109 जणांचा मृत्यू झाला. 321 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 142 सक्रिय रुग्ण आहेत.

तरीही काळजी घ्या

म्युकर मायकोसिसची लागण झाल्यास डोळे चुरचुरणे-दुखणे, लाल होणे, स्राव येणे, दृष्टी कमी होणे, नाकातून दुर्गंधी येणारा स्राव येणे, नाक दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, नाकातून बुरशीजन्य दुर्गंधीयुक्त काळा स्राव येणे, डोके दुखणे अशा लक्षणांनंतर म्युकर मायकोसिसचा विषाणू मेंदूवरही आघात करतो. त्यामुळे मुंबईकरांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.