
पोलीस असल्याची बतावणी करून रिक्षाचालकाचे पाकीट घेऊन पळालेल्या ठगाला सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली. सलीम मोहम्मद नबी शेख असे त्याचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी एक पाकीट जप्त केले आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी वांद्रे आणि सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
सांताक्रुझ येथील एका ठिकाणी चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा स्पीडब्रेकरवर उडाली. तेव्हा सलीमने त्या रिक्षाचालकाशी वाद घातला. रिक्षा स्पीडब्रेकरवरून उडाल्याने डोक्याला लागले आहे. मी पोलीस असून तुझे लायसन्स दाखव असे सांगून रिक्षाचालकाला धमकावले. भीतीपोटी त्या रिक्षाचालकाने लायसन्स दाखवण्यासाठी खिशातून पाकीट काढले. लायसन्स पाहण्याचा बहाणा करून सलीम काही अंतर पुढे गेला. त्यानंतर त्याने एका गल्लीतून पळ काढला. फसवणूक झाल्याप्रकरणी रिक्षाचालकाने सांताक्रुझ पोलीस ठाण्यात धाव घेतली. सांताक्रुझ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पथकातील उपनिरीक्षक शिवाजी शिंदे, शेंदरकर, शिरसाट, महाजन यांच्या पथकाने तपास करत सलिमला अटक केली.























































