
अल्पवयीन मुलाने वाहन चालवून मोटारसायकलस्वाराला धडक दिल्याची घटना शनिवारी कांदिवलीच्या ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरात घडली. वाहनाच्या धडकेत आसिफ पठाण हा तरुण जखमी झाला आहे. आसिफच्या तक्रारीवरून समतानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केले.
अल्पवयीन मुलगा हा ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरात राहतो. शनिवारी दुपारी तो वाहनात पेट्रोल भरण्यासाठी कविता वाईन्सजवळील परिसरात आला. तेव्हा आसिफच्या मोटारसायकलने अल्पवयीन मुलाच्या वाहनाला कट मारली. कट मारल्यानंतर आसिफ हा काही अंतर जाऊन पुढे थांबला. त्यानंतर अल्पवयीन मुलाने आसिफच्या मोटारसायकलला मागून धडक दिली. या धडकेत आसिफ हा जखमी झाला. या घटनेची माहिती समजताच समतानगर पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी आसिफला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. आसिफने दिलेल्या तक्रारीवरून समतानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.





























































