
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील सर्व क्षेत्रांना फटका बसला, पण ई-कॉमर्स क्षेत्रातील अॅमेझॉनची मात्र चलती सुरू आहे. या काळात अॅमेझॉनने पुकारलेल्या ‘स्मॉल बिझनेस डे’च्या निमित्ताने तब्बल 84 हजार व्यापाऱ्यांना ऑर्डर्स मिळाल्याचे दिसून आले आहे. मुख्य म्हणजे या ऑर्डर्समध्ये 68 टक्के ऑर्डर्स या बिगर मेट्रो शहरातील व्यापाऱ्यांना मिळाल्या आहेत.
अॅमेझॉन इंडियाने 2 ते 4 जुलैदरम्यान ‘अॅमेझॉन स्मॉल बिझनेस डे’चे आयोजन केले होते. त्यासंदर्भातील आकडेवारी कंपनीने नुकतीच जाहीर केली. त्यावेळी वरील बाब समोर आली. यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा 1 कोटी रुपयांहून अधिकच्या किमतीच्या ऑर्डर्स मिळविणाऱ्या व्यापाऱ्यांच्या तुलनेत 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर साडेसात हजार व्यापाऱ्यांना एका दिवसांत सर्वाधिक ऑर्डर्स मिळण्याची संख्येत गेल्या वर्षीच्या तुनलनेत 2.8 टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली. यात एकूण 23 राज्यातील एकूण 125 शहरांमधील 1700 स्थानिक दुकानदारांनी सहभाग घेतला होता. या ऑर्डर्समध्ये फूड प्रोसेसर, ऑर्गेनिक मध, लॅपटॉप टेबल, ब्लूटूथ इअरफोन, मास्क आणि योगा मॅटसारख्या उत्पादनांचा समावेश असल्याची माहिती अॅमेझॉन इंडियाचे प्रणव भसीन यांनी दिली.
























































