ग्रामसेवकाला हाताशी धरून गावच्या विकासासाठी आलेल्या 25 लाखांहून अधिक निधीचा अपहार करणाऱ्य़ा सरपंचाला पाच महिन्यांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे, तर ग्रामसेवक अजूनही फरार आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील सारोळे पठार ग्रामपंचायतीत अपहाराची ही घटना घडली होती.
तत्कालीन सरपंच व विद्यमान उपसरपंच प्रशांत गवराम फटांगरे असे अटक केलेल्याचे नाव आहे, तर सुनील शेळके हा फरार आहे.
सारोळे कासार गावातीलच एका जागरूक ग्रामस्थाने जानेवारी 2020मध्ये गटविकास अधिकाऱयांकडे तक्रार केल्याने अपहाराची घटना समोर आली होती. तक्रार दाखल होताच गटविकास अधिकाऱयांनी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करून तत्काळ चौकशीचा आदेश दिला होता.
समितीने या प्रकरणाचा तपास करून 2012-13 ते 2017-18 या कालावधीत सारोळे पठारचे सरपंच प्रशांत फटांगरे व ग्रामसेवक सुनील शेळके यांनी अपहार केल्याचा अहवाल जुलै 2020 रोजी गटविकास अधिकाऱयांना सोपविला होता. त्याआधारे वरील दोघांनाही वेळोवेळी नोटिसा बजावून आपले म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले. सरपंच फटांगरे यांनी एकाही नोटिशीचा खुलासा केला नाही. ग्रामसेवक शेळके यांनी मात्र आपले म्हणणे सादर केले. त्याची पडताळणी करून चौकशी समितीने अंतिम अहवाल सादर केला. त्यामध्ये सरकारने ज्या गोष्टींसाठी निधी दिला होता, त्याचे अंदाजपत्रक घेणे, मूल्यांकन करून घेणे, त्याला मासिक सभेत ग्रामपंचायतीची मंजुरी घेणे या गोष्टींकडे दुर्लक्ष करून दोघांनी अनेक वेळा स्वतःच्या नावाने धनादेश काढून सारोळे पठार गावाच्या विकासासाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या 25 लाख 21 हजार 911 रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला.
याप्रकरणी विस्तार अधिकारी सुनील माळी यांनी फेब्रुवारी 2021मध्ये घारगाव पोलीस ठाण्यात फटांगरे व शेळके या दोघांविरोधात फसवणूक व अपहार केल्याची फिर्याद दाखल केली. यावरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता; परंतु तेव्हापासून दोघेही पसार झाले होते. पाच महिने उलटून गेल्यानंतर सरपंच फटांगरे हा कुटुंबाला भेटण्यासाठी आपल्या घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी फटांगरे याच्या मुसक्या आवळल्या.

























































