
पावसाची संततधार कायम असल्याने संगमेश्वर तालुक्यातील माखजन धामापूर मार्गावरील रामणवाडी येथील जांगलदेव मंदिराजवळील मोरी खचल्याने अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोरी खचल्याचे समजताच मावळंगे शिवसेना शाखा प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते बाबू मोरे यांनी या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देऊन अपघाताची घटना घडू नये, म्हणून वाहन धारकांना सावध करण्यासाठी दगड ठेवले आहेत.
मागील दोन वर्षांपूर्वी मोरी खचली होती, मात्र बांधकाम विभागाने तात्पुरती मलमपट्टी करत आजचे काम उदयावर ढकललेले होते. तसेच अनेकदा याबाबत ग्रामस्थांसह वाहन धारकांनी आवाज उठवला होता. मात्र, बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले. मागील दोन दिवसापासुन पावसाचा जोर वाढल्याने हि मोरी अधिकच खचत गेली.
त्यामुळे आता या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. तसेच या मोरीपासून थोड्या अंतरावर दुसरी मोरी असून या मध्ये गाळ साचला असल्याने मोरी मधून पाणी न जाता रस्त्यावरून वाहत आहे. मात्र, या पाण्याचा त्रास सर्वसामान्यांना मोरीवरून चालत जाताना होत आहे. या मार्गावर मोठ्याप्रमाणावर खड्डे पडले आहेत.
रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढली असल्याने मार्ग अधिकच धोकादायक बनला आहे. या मार्गाची तत्काळ दुरुस्ती बांधकाम विभागाने करावी अशी मागणी मावळंगे शिवसेना शाखा प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते बाबू मोरे यांनी केली आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी वर्गाला केव्हा जाग येणार याचीच ग्रामस्थासह सर्वसामान्य वाहन धारकांना प्रतीक्षा लागली आहे.
























































