पाच दिवसांचा ‘लेटमार्क’ ; मान्सूनने अखेर संपूर्ण देश व्यापला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाच दिवसांच्या विलंबानंतर मान्सूनने अखेर राजधानी दिल्लीसह संपूर्ण देश व्यापला आहे. सर्वसाधारणपणे 8 जुलैला मान्सून संपूर्ण देशभरात पोहोचतो. यंदा मात्र त्याला पाच दिवसांचा ‘लेटमार्क’ लागला. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मंगळवारी ही माहिती दिली.

मागील चार दिवसांपासून बंगालच्या खाडीवर आर्द्रता असलेले पूर्वोत्तर वारे वाहत आहेत. त्यामुळे ढगांचे साम्राज्य वाढून मान्सूनच्या सक्रियतेला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. याचाच परिणाम म्हणून अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागली आहे. मान्सूनने दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा, राजस्थानसह देशातील उर्वरित भागही व्यापून टाकला आहे, असे हवामान खात्याने जाहीर केले आहे. सोमवारी मान्सूनने राजधानी दिल्लीला हुलकावणी देत जैसलमेर आणि गंगानगर जिह्यांपर्यंत धडक मारली होती. मात्र मंगळवारी दिल्लीच्या अनेक भागांत दमदार हजेरी लावून मान्सूनने अखेर संपूर्ण देशाला सुखावून टाकले. पावसाच्या हजेरीमुळे दिल्लीकरांना भीषण गरमीपासून मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी केरळमध्ये चार दिवस उशिराने दाखल झालेला मान्सून पुढे 26 जूनला संपूर्ण देशभर पोहोचला होता.

16 दिवस उशिराने दिल्लीत धडक

मान्सूनने राजधानी दिल्लीत पोहोचण्यासाठी यंदा 16 दिवसांचा विलंब केला. 19 वर्षांत पहिल्यांदा राजधानीमध्ये मान्सूनचे आगमन होण्यास इतका उशिर झाला. यापूर्वी 2002 मध्ये 19 जुलैला मान्सून दिल्लीत पोहोचला होता.