
कोरोना विषाणू नवनव्या व्हेरिएंटच्या माध्यमातून देशातील विज्ञान आणि शास्त्रज्ञांपुढे आव्हान उभे करीत आहे. आधीच डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या धडकी भरवत आहे. त्यात आता उत्तर प्रदेशपाठोपाठ राजस्थानमध्ये कप्पा व्हेरिएंटचे नवीन 11 रुग्ण सापडले आहेत. डेल्टाप्रमाणेच कप्पा व्हेरिएंटने हातपाय पसरल्यामुळे संपूर्ण देशातील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
आरोग्य क्षेत्रातील तज्ञांच्या म्हणण्यानुसार, कप्पा व्हेरिएंटसुद्धा डबल म्युटेंट आहे. डेल्टा, डेल्टा प्लस आणि लॅम्ब्डा या कोरोनाच्या नवनव्या प्रकारांमुळे विषाणूचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आणायचा कसा, असा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. राजस्थानातील कप्पा व्हेरिएंटच्या 11 पॉझिटिव्ह रुग्णांबाबत राज्याचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी माहिती दिली आहे. राज्यात अलवार व जयपूरमध्ये प्रत्येकी चार, बारमेरमध्ये दोन आणि भिलवाडामध्ये एक रुग्ण सापडल्याचे त्यांनी सांगितले. जयपूरच्या एसएमएस मेडिकल कॉलेजने दिल्ली व पुण्याच्या प्रयोगशाळेकडे कोरोनाचे पॉझिटीव्ह नमुने पाठवले होते. त्यात विषाणूच्या नव्या व्हेरिएंटचा उलगडा झाला आहे. याआधी उत्तर प्रदेशात दोन, तर त्रिपुरामध्ये 11 रुग्णांचे नमुने कप्पा पॉझिटीव्ह आढळले आहेत.
कप्पा व्हेरिएंटची लक्षणे
कोरोनाच्या इतर व्हेरिएंटप्रमाणेच कप्पा व्हेरिएंटची लक्षणे आहेत. यात ताप, खोकला, चव आणि वास न कळणे, अंगदुखी, डोकेदुखी, तोंड कोरडे पडणे यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे. काही रुग्णांच्या नाक आणि डोळ्यांतून पाणी येते, शरिरावर लाल डाग पडणे अशाप्रकारचीही लक्षणे दिसून येतात. कप्पा व्हेरिएंटला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ ऐवजी ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ घोषित केले आहे.

























































