
वाढत चाललेला ‘एनपीए’ लपविण्यासाठी बोगस व नियमबाह्य कर्जप्रकरणे नगर अर्बन मल्टिस्टेट बँकेत झाल्याची कबुली वरिष्ठ अधिकाऱ्य़ांनी दिली आहे. मात्र, या बोगसपणामुळे बँकेला रिझर्व्ह बँकेने केलेल्या 40 लाखांच्या दंडाची चौकशी, जबाबदारी निश्चिती व वसुली बँकेच्या प्रशासनाने बासनात गुंडाळून ठेवली आहे. बँकेवर मागील दोन वर्षांपासून प्रशासक असून, किमान त्यांनी तरी या दंडाच्या वसुलीला गती देण्याची मागणी सभासदांमधून होत आहे. दरम्यान, या दंडवसुलीसह अन्य अनुषंगिक मुद्दय़ांवर येथील ‘नगर अर्बन बचाव कृती समिती’ने बँकेत पुन्हा आंदोलनाचे नियोजन सुरू केले आहे.
कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी म्हणाले, ‘कुठलाही गुन्हा नोंदविल्यानंतर होणाऱ्य़ा तपासात गुन्हा करण्याचा हेतू महत्त्वाचा असतो. नगर अर्बन बँकेने अनेक बोगस व नियमबाह्य कर्जप्रकरणे करून व यातून बँकेची फसवणूक झाली म्हणून कर्जदार, जामीनदार व संचालक मंडळावर गुन्हे दाखल झाले आहेत. अशी कर्जे करून त्यातील रक्कम इतरत्र वळविण्याचा आमचा हेतू फक्त बँकेचा ‘एनपीए’ लपविणे हाच होता, अशी लेखी कबुली बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्य़ांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर या अधिकाऱ्य़ांचा हा हेतू होता तर बोगस कर्जप्रकरणांमध्ये नेमके गुन्हेगार कोण आहेत? वरिष्ठ अधिकाऱ्य़ांनी हे नेमके कोणाच्या दबावाखाली केले? तसेच हा हेतू साध्य करण्यासाठी काही ठरावीक म्हणजे अगदी बोटावर मोजता येणाऱ्य़ा व मर्जीतील खात्यांचाच वारंवार वापर झालेला आहे. कोणाच्या थकीत खात्यात नेमका किती ‘एनपीए’ आहे व हा ‘एनपीए’ लपविण्यासाठी नेमकी तेवढीच रक्कम त्या त्या थकीत कर्ज खात्यात वर्ग करण्याचे काम बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्य़ांशिवाय कोणीच करू शकत नाही,’ असा दावाही गांधी यांनी केला.
‘नगर अर्बन बँकेत ‘एनपीए’ लपविला जात आहे व खोटी आर्थिक पत्रके तयार केली जात आहेत, याची माहिती रिझर्व्ह बँकेलादेखील होती. हा अपराध लक्षात आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेला तब्बल 40 लाख रुपयांचा दंड केला होता. तो बँकेकडून वसूलदेखील केला आहे. म्हणजे बोगस व नियमबाह्य कर्जे करण्याचा हेतू स्पष्ट झालेला असताना, या हेतूची कोठेही चौकशी अथवा कारवाई झालेली नाही.
नगर अर्बन बँकेला 40 लाख रुपयांचा दंड का व कोणामुळे झाला? या दंडाची रक्कम त्या दोषींकडून वसूल करण्याची प्रक्रिया सुरू का केली जात नाही? संभाजीनगर येथील ज्येष्ठ कायदे सल्लागारांनी सल्ला दिला असताना, या सल्ल्याला कचऱ्य़ाची टोपली कोणी दाखविली? बँकेच्या ऱहासाला कारणीभूत ठरलेल्या ‘मल्टिस्टेट’ दर्जाचे अजूनही समर्थन कोण करीत आहे? त्यासाठी बँकेच्या मूळ पोटनियमांची प्रत बँकेतून कोणी पळविली? ही प्रत गहाळ झाली म्हणून लेखी दिले असताना, तसेच इतका महत्त्वपूर्ण दस्तऐवज चोरीला गेला असताना, त्याबद्दल पोलीस फिर्याद का नोंदविली नाही? व मूळ पोटनियम गहाळ झालेले असताना, बँक खोटय़ा पोटनियमांवर कशी काय चालविली जात आहे? अशा अनेकविध प्रश्नांची उत्तरे बँकेच्या प्रशासकांकडून व प्रशासनाकडून सभासदांना दिली जात नाही,’ असेही गांधी यांचे म्हणणे आहे.
थकबाकी वसुलीबाबत ठरावीक खात्यांवर मेहेरबानी
नगर अर्बन बँकेला, तसेच सभासदांना व ठेवीदारांना योग्य न्याय मिळण्यास विलंबच लागणार, हे नक्की दिसत असले, तरी बँक बचाव कृती समितीने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यामुळे काहीतरी थकबाकी वसुली होत आहे; परंतु वसुलीत काही ठरावीक कर्ज खात्यांवर अजूनही मेहेरबानी दाखविली जात आहे. सिक्युरिटायझेशनच्या नोटिसा पाठविण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. त्यामुळे बँक बचाव समितीला पुन्हा एकदा प्रशासकांच्या दालनात आंदोलन करावे लागणार असल्याचा इशाराही गांधी यांनी दिला आहे.



























































