घामातून होणार वीजनिर्मिती, शास्त्रज्ञांनी लावला नवीन शोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात विजेला मागणी वाढत आहे. या वाढत्या मागणीला पुरं पडण्यासाठी जगभरात निरनिराळ्या साधनसंपत्तीचा उपयोग केला जातो. पाणी, कोळसा, सूर्य अशा पारंपरिक स्रोतांपासून वीजनिर्मिती केली जाते. आता यात अजून एका स्रोताची भर पडण्याची चिन्हं आहेत.

अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी एका विशिष्ट टूलचा शोध लावला आहे. हे टूल तुमच्या घामापासून वीजनिर्मिती करू शकेल. तसंच घाम येण्यासाठी तुम्हाला विशेष श्रम करण्याचीही गरज उरणार नाही. येथील एका अहवालानुसार, इंजिनियरिंग क्षेत्रातील तज्ज्ञांना याआधीच हा स्रोत माहीत होता. त्यांनी तशा मशीनची निर्मितीही केली होती. पण, त्याचा उपयोग मानवी शरीरावर करण्यात आला नव्हता.

आता जे उपकरण बनवण्यात आलं आहे. त्यात मानवी घामामधून वीजनिर्मिती होऊ शकणार आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठात नॅनो इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाचे प्राध्यापक जोसेफ वांग यांच्या म्हणण्यानुसार ते अशा प्रकारचं उपकरण शोधत होते, ज्यात जास्त श्रम न करताही घाम निर्माण होईल आणि वीज निर्मिती होऊ शकेल. आता या नवीन उपकरणात तशीच यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.

हे उपकरण बोटांवर परिधान करायचं आहे. ते परिधान करून तुम्ही रोजची सगळ कामं करू शकता. हे उपकरण तुमच्या घामातील लॅक्टेट या घटकाचा वापर करून वीजनिर्मिती करतं. सतत घाम येण्याने या उपकरणाच्या सर्किटमध्ये इलेक्ट्रान प्रवाही होतात आणि वीज तयार होते.

हे उपकरण रोजच्या वापरासाठी योग्य असून त्यातून वीजनिर्मितीची प्रक्रिया अधिक सहज होणार असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.