
आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा येत्या 20 जुलै रोजी साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमिवर आषाढी सोहळा शासनाच्यावतीने प्रातिनिधीक व मर्यादित स्वरुपात साजरा होत आहे. या काळात परवानगी धारक भाविकांच्या व्यतिरिक्त कोणीही पंढरपूरात येवू नये. म्हणून त्रिस्तरीय नाकाबंदीसह दि. 18 ते 25 जुलै दरम्यान पंढरपूर शहरात 8 दिवसांची तर परिसरातील 9 गावात 5 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एसटी बससेवाही बंद करण्याचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी हे आदेश जारी केले आहेत.
कोट्यावधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या व दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या येथील श्री विठ्ठल-रूक्मिणीची वर्षभरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून आषाढी यात्रा ओळखली जाते. आषाढीला राज्यभरातून तसेच कर्नाटक, आंध्र, केरळ, ताळिनाडू आदी भागातून 12 ते 16 लाख भाविक येतात. मात्र गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या धास्तीने यात्रा केवळ परंपरा जपण्यासाठी प्रातिनिधीक व मर्यादित स्वरुपात साजर्या केल्या जात आहेत. त्याअनुषंगाने मानाच्या दहा पालख्या व त्या पालख्यांसमवेत परवानगी दिलेल्या विश्वस्त, महाराज, भाविक यांनाच पंढरपूरात येण्याची परवानगी दिली होती.
इतर भाविक अथवा नागरिकांनी पंढरपूरात येवू नये म्हणून दि. 18 रोजी सकाळी 6 ते दि. 25 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत या वेळेत शहरात, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा घाट, मंदिर परिसरात संचारबंदी असणार आहे. या काळात दि. 17 ते 25 जुलै पर्यंत एसटी बससेवा व सर्व खासगी वाहतूक बंद राहणार आहे. तर पंढरपूर शहरालतच्या गोपाळपूर येथे दि. 18 रोजी सकाळी 6 ते दि. 24 जुलै रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
तसेच परिसरातील लक्ष्मी टाकळी, वाखरी, गादेगाव, कौठाळी, भटुंबरे, शेगाव दुमाला, चिंचोली भोसे, शिरढोण, कोर्टी आदी गावातही दि. 18 रोजी सकाळी 6 ते दि. 22 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
* कोरोनाच्या पार्श्वभुमिवर आषाढी यात्रा एकादशी सोहळा 20 जुलै रोजी
* आषाढी यात्रेत शहरात दि. 18 ते 25 जुलै दरम्यान कडक संचारबंदी
* परिसरातील 10 गावात दि. 22 जुलै पर्यंत संचारबंदी
* चंद्रभागा वाळवंट व प्रदक्षिणामार्गावर कलम 144 लागू
* सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी
*17 ते 25 जुलै पर्यंत एसटी बससेवा व सर्व खासगी वाहतूक बंद
संचारबंदी यांना लागू होणार नाही
* अत्यावश्यक सेवेतील कार्यरत अधिकारी व कर्मचारी
*पंढरपूर मंदिर समितीकडील पासधारक व परवानाधारक व्यक्ती
* कर्तव्यावर असणारे अधिकारी व कर्मचारी
* दुध, दवाखाने, मेडीकल अत्यावश्यक सेवा
* परवानगी दिलेल्या 10 पालख्या व सोहळे यांना प्रवेश
































































