
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्राकडे एम्पेरिकल डेटा मागण्याचा ठराव मांडला जात असताना सभात्याग करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याच डेटासाठी मंत्री छगन भुजबळ यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आपण एकत्रितपणे काम करू, त्यात काही अडचण नाही. मी तुमच्यासोबत काम करेन, तुम्ही त्याचं नेतृत्व करा. आमच्याकडून पूर्ण मदत होईल, असे आश्वासन भुजबळांनी घेतलेल्या भेटीवेळी त्यांनी दिले.
छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी सकाळी भेटीसाठी पोहोचले होते. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून झालेल्या या भेटीत नेमकी काय चर्चा झाली यासंबंधी देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली. ते म्हणाले, ‘छगन भुजबळ ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात मला भेटण्यासाठी आले होते. त्यांनी मला एम्पेरिकल डेटा कसा गोळा करता येईल यासंबंधी माझे मत जाणून घेतले. यावेळी मी त्यांना मराठा आरक्षणावेळी कसा एम्पेरिकल डेटा गोळा केला आणि तो सुप्रीम कोर्टाने कसा वैध ठरवला याची माहिती दिली. तसंच त्यांनी पुढाकार घ्यावा, एजन्सी नेमाव्यात; आमच्याकडून पूर्ण मदत केली जाईल, असे सांगितले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आपण एकत्रितपणे काम करू, त्यात काही अडचण नाही.
ओबीसी आरक्षणासाठी सर्व पक्षांनी सार्वत्रिक नेतृत्व केलेपाहिजे – छगन भुजबळ
राज्यात ओबीसींचे स्थगित झालेल्या राजकीय आरक्षणासाठी सर्व पक्षांनी एकत्र येत सार्वत्रिक नेतृत्व केले पाहिजे आणि आरक्षण टिकविले पाहिजे, असे मत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मांडली. ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकावे यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करण्याची माझी तयारी आहे. आमचा उद्देश हा ओबीसी आरक्षण टिकावे असा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतदेखील चर्चा करण्यासाठी मी गेलो होतो. त्यांचादेखील ओबीसी आरक्षणाला विरोध नाही, त्यामुळे सर्व स्तरांतून आरक्षणासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. ओबीसी आरक्षणासाठी एम्पेरिकल डाटा मिळावा यासाठी कोणकोणते पर्याय आहेत यावरदेखील आमच्यात चर्चा झाली, असे भुजबळ म्हणाले.






























































