ठाण्यातील तरुणाचं दुबईत चमकलं नशीब, तब्बल 7.5 कोटी रुपयांची लागली लॉटरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुणाचं नशीब कधी बदलेल याचा काही नेम नाही. ठाण्यातील गणेश शिंदे हा तरुण रातोरात मालामाल झाला आहे. संयुक्त अरब अमिरातीतील एका लकी ड्रॉ स्पर्धेत गणेशला तब्बल 7.50 कोटी रुपयांचे बक्षीस लागले आहे.

मूळचा ठाण्याचा रहिवाशी असलेला गणेश शिंदे हा पेशाने खलाशी आहे. तो ज्या कंपनीत काम करतो ती कंपनी ब्राझीलची आहे. दरवेळी दुबई व रिओ डी जानिरो दरम्यान प्रवास करताना तो काही काळ दुबईला थांबतो. गल्फने दिलेल्या वृत्तानुसार गणेशने एका वेबसाईटवरून लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. लॉटरीचा ड्रॉ निघाला त्यात गणेश विजेता ठरला आहे.

16 जूनला गणेशने लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. लॉटरी लागल्यानंतर गणेश म्हणाला, ‘‘गेल्या दोन वर्षांपासून मी नियमितपणे लॉटरीचे तिकीट खरेदी करतोय. बक्षीस जिंकेन असे कधी स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. अजूनही मी निःशब्द आहे. माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. दुबई डय़ुटी फ्रीचा मी खूप आभारी आहे.’’ मिळालेल्या पैशातून मी एक कार आणि नवीन घर खरेदी करेन तसेच मुलाच्या शिक्षणासाठीही पैसे गुंतवेन, असे त्याने सांगितले.