पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात दरड कोसळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात सकाळी दरड कोसळली. यात छोटे-मोठे दगड डोंगरमाथ्यावरून पुणे-नाशिक रस्त्यावर येऊन पडले. त्यामुळे काही काळ एकेरी वाहतूक सुरू होती.

पुणे-नाशिक महामार्गाचे खेड ते सिन्नर असे चौपदीकरण झाल्याने डोंगर फोडून धोकादायक वळणे काढण्यात आली. त्यासाठी सुरुंगाचा वापर करण्यात आल्याने डोंगरांना तडे गेले आहेत. त्यात पावसाळ्यात पावसाचे पाणी झिरपते. त्यामुळे अनेक छोटे-मोठे दगड सुटे होतात. संगमनेर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने सकाळी सात वाजण्याच्या सुमारास छोटे-छोटे दगड पुणे-नाशिक लेनवर पडले. याबाबत माहिती समजताच डोळासणे पोलीस मदत केंद्राचे अरविंद गिरी यांच्यासह हिवरगाव टोल प्लाझाच्या कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेत हे दगड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात सुरक्षाजाळी तुटून मोठमोठे दगड महामार्गावर येऊन पडल्याने नाशिककडे जाणारा रस्ता बंद झाला होता. ही वाहतूक इतर ठिकाणाहून वळविण्यात आली होती. आठवडय़ात तीन वेळा दरड कोसळली होती. लाखो रुपये खर्चून सुरक्षाजाळी बसवण्यात आली. तरीही दरडी कोसळत असल्याने घाट परिसरातून प्रवास करताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.