
टोकियो ऑलिम्पिकसाठी जेमतेम चार दिवस राहिलेले असताना कोरोना संसर्गाचा धोकाही वाढायला सुरुवात झाली आहे. ज्या क्रीडाग्राममध्ये क्रीडाविश्वातील सर्व खेळाडू मुक्कामाला आहेत, तेच खेळगाव आता सुरक्षित राहिलेले नाही. क्रीडाग्राममध्ये आणखी दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह झाले असून क्रीडाग्रामबाहेर राहणाऱया एका खेळाडूला कोराना झाल्याचे स्पष्ट झाल्याने स्पर्धा आयोजकांचे धाबे दणाणले आहे. कोरोनाग्रस्त खेळाडूंची संख्या तीनवर पोहोचली असून या सर्वांना 14 दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीत पाठवण्यात आले आहे. टोकियो ऑलिम्पिक आयोजन समितीने रविवारी ही माहिती दिली. मात्र खेळाडूंची नावे अद्यापि जाहीर करण्यात आलेली नाहीत.
स्पर्धा आयोजन समितीने जाहीर केलेल्या कोरोनाग्रस्तांच्या यादीत दिवसभरात 10 जणांचा समावेश झालाय. यात पाच प्रत्यक्ष खेळाशी संबंधित असून एक पंत्राटदार आणि एका क्रीडा पत्रकाराचाही समावेश आहे. समितीच्या नोंदीनुसार ऑलिम्पिक स्पर्धेशी संबंधित कोरोनाग्रस्तांची संख्या आता 56वर पोहोचली आहे. त्यामुळे 23 जुलैपासून सुरू होणाऱया ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या जैव-सुरक्षित (बायो-बबल) परिघावर यानिमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
18 हजाराहून अधिक खेळाडू पोहोचले
टोकियो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर मागील 18 दिवसांत देशविदेशातील 18 हजाराहून अधिक खेळाडू जपानमध्ये दाखल झाले आहेत. विमानतळावर येताच सर्वच पाहुण्यांचा कोरोना चाचणीने पाहुणचार होतो. सर्वांसाठी आधीचे दोन कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक करण्यात आलेले आहेत. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे सर्व प्रकारचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. मात्र तरीही कोरोनाची प्रकरणे समोर येत असल्याने भीतिदायक वातावरण निर्माण झाले आहे.
सहा दिवसांपूर्वीच उघडले क्रीडाग्राम
ऑलिम्पिक क्रीडाग्राम सहा दिवसांपूर्वीच उघडण्यात आले आहे. या खेळगावात ऑलिम्पिक दरम्यान जवळपास 11 हजार खेळाडू आणि हजारो सपोर्ट स्टाफ वास्तव्यास राहणार आहेत. मात्र ऑलिम्पिक स्पर्धेचे केंद्रस्थान असणाऱया या क्रीडाग्राममध्येच कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्पर्धा आयोजकांची जबाबदारी आणखी वाढली आहे.
कोरोनाग्रस्तांची संख्या 56वर
ऑलिम्पिक स्पर्धेशी संबंध असलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या आता 56पर्यंत गेली आहे, अशी माहिती ऑलिम्पिक समितीचे मुख्य कार्यकारी संचालक खिस्टोफ डुबी यांनी दिली. कोरोनाग्रस्तांची संख्या ही फक्त आकडेवारीपुरती मर्यादित नसते. कारण कोरोनाग्रस्त व्यक्तीचा लगेच बंदोबस्त करावा लागतो. शिवाय त्याच्या संपर्कातील व्यक्तींनाही खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरणात जावे लागते. त्यामुळे हे फार आव्हानात्मक आणि किचकट काम आहे, असेही डुबी यांनी स्पष्ट केले.
‘आयओसी’चे कोरियन अधिकारी पॉझिटिव्ह
माजी ऑलिम्पिक चॅम्पियन आणि दक्षिण कोरियाच्या टेबल टेनिस संघाचे अध्यक्ष रयू सेउंग-मीन हे जपानमध्ये दाखल होताच नारिता विमानतळावर झालेल्या कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळले. शनिवारी रात्री उशिरा त्यांनी सोशल मीडियावर आपल्याला कोराना झाल्याची माहिती दिली; पण रविवारी सकाळी त्यांनी आपली पोस्ट डिलीटही केली. चार वेळचे ऑलिम्पियन आणि अॅथलीट आयोग व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) शिक्षा आयोगाचे सदस्य असलेले रयू सेउंग-मीन आयओसीच्या सत्रात सहभागी होणार होते. मात्र कोरोना झाल्यामुळे मला दुर्दैवाने या आयओसीच्या सत्रात सहभागी होता येणार नाही. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही मला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र मला कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.




























































