उत्तर प्रदेशात प्रवासासाठी निगेटिव्ह कोविड रिपोर्ट बंधनकारक, योगी सरकारचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात बाहेरून राज्यात येणारे प्रवासी, पर्यटक आणि इतरांसाठी आता कठोर नियमावली असणार आहे. उत्तर प्रदेशात प्रवेशासाठी अन्य राज्यांतील नागरिकांनी कोविड निगेटिव्ह रिपोर्ट आता अनिवार्य केला आहे. योगी सरकारने याबाबतचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि वरिष्ठ अधिकाऱयांची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. दुसऱया राज्यातून उत्तर प्रदेशात येणाऱया लोकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

देशातील ज्या राज्यांत कोरोना रुग्णवाढीचा दर हा 3 टक्क्यांपेक्षा अधिक आहे अशा राज्यांतून उत्तर प्रदेशात येणाऱया प्रवाशांना ‘आरटीपीसीआर’ टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा टेस्ट रिपोर्ट चार दिवस जुना असला तरच ग्राह्य धरला जाणार आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना टेस्ट रिपोर्टच्या अटीतून सूट देण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना रुग्णांचे ट्रेसिंग, टेस्टिंग अॅण्ड ट्रीटमेंट करण्यावर भर दिला. त्याचबरोबर कोरोनाबाधित राज्यातून उत्तर प्रदेशात आल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात यावे, असे स्पष्ट केले आहे. राज्यात येणाऱया व्यक्तींची अँटिजेन टेस्ट आणि थर्मल स्पॅनिंग करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना रोखण्यासाठी देण्यात आलेल्या नियमावलीचे सक्तीने पालन करण्याचे आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. तिसऱया लाटेचा संभाव्य धोका पाहता उत्तर प्रदेश सरकारने शनिवारी कावड यात्रा रद्द केली आहे. पुढचे काही दिवस महत्त्वाचे असल्याने उत्तर प्रदेश सरकारने आतापासून कोरोना नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.