
मागील दोन दिवसापासून सतत होणाऱ्या मुसळधार पावसाने पेण तालुक्याला झोडपून काढले आहे. रविवारी दिवसभर, रात्री व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला तर अनेक गावांतील घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागोठणे एस. टी. स्टँड व नागोठणे कोळीवाडा परिसरात अंबा नदीचे पाणी शिरले आहे. नागोठणे ते पोयनाड रोडवरील कुहिरे गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आलेली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यांतील जिते गावच्या हद्दीत बाळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बाळगंगा नदी तुडूंब भरून वाहत असल्याने मुंबई-गोवा महामार्ग पाण्याखाली गेला होता. महामार्गाला नदीचे स्वरूप आल्याने गाडी चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती.
पेण तालुक्यातील रावे, साई गाव, खरोशी, जिते, तांबडशेत, चूनाभट्टी या गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. बाळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक गावातील घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरले होते. यामुळे ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
पेण तालुक्यातील बळवली, दुरशेत खरोशी या गावांचा संपर्क तुटला होता. तसेच तांबडशेत जोहा रस्ता पाण्याखाली गेला आहे. बळवली गावातील 20 ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच दुरशेत येथे दरड कोसळून 4 घरांचे नुकसान झाले आहे. चुनाभट्टी येथील 82 ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. चुनाभट्टी येथे घरामध्ये पाणी शिरल्याने अडकलेल्या 4 ग्रामस्थांना वाचविण्यात यश आले आहे.
पूरसदृश्य परिस्थितीत अडकलेल्या ग्रामस्थांना मदत करण्याकरिता पेण तहसील कार्यालयाकडून तलाठी, सर्कल, कोतवाल व स्थानिक सरपंच यांचे विविध पथके तयार करण्यात आली आहेत. सदरची पथके प्रत्यक्ष जागेवर जाऊन मदत कार्य करीत आहेत. सायंकाळी 6:30 वाजता भरतीची वेळ आहे. त्यावेळेस अतिवृष्टी झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये म्हणून इंडियन कोस्ट गार्ड चे पथक मुरुड येथून पेण येथे पाचारण करण्यात आले आहे.
वेधशाळेने अतिवृष्टी होण्याचा इशारा दोन दिवस अगदरच दिल्याने खाडी किनाऱ्यावरील गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला होता. सोमवारी दुपारपर्यंत कोणत्याही प्रकारची जीवीत हानी किंवा पशुधन हानी झाली नव्हती अशी माहिती पेणच्या तहसीलदार डॉ. अरुणा जाधव व नायब तहसीलदार कांबळे यांनी दिली.
पेण शहरातील एसटी स्टँड, कौंडाळ तळे, कोर्ट परिसर, उत्कर्ष नगर आदी सखल भागांमध्ये पाणी साचले होते.तालुक्यातील हमरापूर विभागांमध्ये अतिवृष्टीचे पाणी गणपती कारखान्यांमध्ये शिरल्यामुळे येथील अनेक गणेश कारखानदारांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे गणेश कारखानदारांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. मुसळधार झालेल्या पावसामुळे बळवली, दुरशेत, जिते, चुनाभट्टी, तांबडशेत, हमरापूर येथील ग्रामस्थांच्या घरांमध्ये पहाटे तीन वाजताच पाणी शिरल्याने नागरिकांना मध्ये घबराट निर्माण झाली होती. मुसळधार पाऊस होत असल्याने घरामध्ये साचलेले पाणी बाहेर काढणे कठीण झाले होते. घरातील व दुकानातील सामान भिजल्याने ग्रामस्थांना आर्थिक फटका बसला आहे.
पेण तालुक्यातून नवी मुंबई येथे पाणीपुरवठा करणारे हेटवणे धरण त्याच्या एकूण क्षमतेच्या केवळ 60 टक्के भरले आहे. धरणाची एकूण क्षमता 147 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात आला नाही. हेटवणे धरणातून पाणी सोडल्याच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन हेटवणे धरणाचे मुख्य अभियंता एस. बी.जाधव यांनी केले आहे.






















































